इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांना दिल्ली येथील गणतंत्रदिनाचे निमंत्रण
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 25 जानेवारी
26 जानेवारी रोजी दिल्ली येथे होणार्या गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमाकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते बंडू धोतरे यांना प्रसार भारतीतर्फे निमंत्रण देण्यात आले आहे.
देशातील ‘मन की बात’ कार्यक्रमात गौरवप्राप्त शेकडो व्यक्ती, संस्था प्रतिनिधींना यंदा दिल्ली येथे प्रसार भारतीकडून निमंत्रण देण्यात आले आहे. 27 ऑक्टोबर 2017 रोजीच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये इको-प्रो संस्थेच्या वतीने गोंडकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाकरिता सुरू असलेल्या ‘चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियान’चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख करीत त्यांच्या किल्ला स्वच्छता कार्याचा गौरव करण्यात आला होता. तेव्हा या अभियानास अविरत श्रमदानाचे 200 दिवस पूर्ण झालेले होते. यानंतर एकूण 1020 दिवस करोना टाळेबंदीपर्यंत हे अभियान सुरू होते.
गणतंत्रदिनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला जाण्याचे आमंत्रण मिळाले हे माझे भाग्य आहे. हे इको-प्रो संस्थेच्या कार्याचे आणि माझ्या सहकार्यांच्या परिश्रमाचे कौतुक आहे. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही चंद्रपूरच्या गोंडकालीन ऐतिहासिक वारश्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न केला, आता कुठे हा प्रवास सुरु झाला असून, अजून बरेच काही करणे बाकी आहे. आमच्या या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि तेही समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी पुढे येतील अशी आशा आहे, अशी प्रतिक्रिया बंडू धोतरे यांनी व्यक्त केली