नवी मुंबई- सध्याच्या शैक्षणिक स्पर्धेच्या काळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारी मुले मागे राहू नयेत, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनेही आपल्या हद्दीत सीबीएसई शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने या शाळा चालवण्यासाठी पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांकडून विनंती प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. सन २०१८ -२०१९ या शैक्षाणिक वर्षासाठी नेरूळ आणि कोपरखैरणे येथे सीबीएसई बोर्डाच्या दोन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत एसएससी बोर्डाच्या शाळाप्रमाणेच सीबीएसई, आयसीएससी बोर्डाच्या अनेक शाळा आहेत. या शाळांप्रमाणे पालिकेच्याही शाळा असाव्यात यासाठी दहा वर्षांपासून पालिकेच्या वतीने स्कूल व्हिजनअंतर्गत सर्व पालिका शाळांचा कायापालट करण्यात आला आहे. पालिकेच्या वतीने आपल्या हद्दीत अठ्ठेचाळीस शाळा चालवल्या जातात. या अनेक शाळांच्या इमारती या खासगी शाळांना मागे टाकतील, अशा उत्तम आहेत. यामध्ये मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कम्प्युटर शिक्षणही दिले जात आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात ही मुले मागे राहू नयेत म्हणून पालिका नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत आली आहे. पूर्वी केवळ सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण देणाऱ्या पालिकेने दहावीपर्यंत शाळा सुरू करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या अनेक मुलांना माध्यमिक शिक्षणाची संधी दिली आहे. आणि या मुलांनीही संधीचे सोने करत दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले यश मिळवले आहे. याच पाश्वभूमीवर पालिकेने आत्ताच्या शिक्षणाच्या स्पर्धेचा विचार करता सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नेरूळ सेक्टर ४८ आणि कोपरखैरणे सेक्टर १५ मध्ये या दोन शाळा २०१८-२०१९ या शैक्षणिक वर्षासाठी सुरू केल्या जाणार आहेत या दोन्ही शाळा, फुल स्कूल मॅनेजमेंट विथ प्रायवेट पार्टनर टिचर या तत्त्वानुसार चालवल्या जाणार आहेत. अर्थात शैक्षणिक संस्थांना या शाळा चालवायला दिल्या जातील. शाळांचे शिक्षकही त्याच संस्थांचे असतील. मात्र शाळांच्या इमारती पालिकेच्या असतील आणि या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांचा शैक्षणिक खर्च पालिका करेल. यासाठी पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. आठ मार्चपर्यंत संस्थांना आपले प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी दिली आहे.