भिख मागण्यासाठी चोरले एका दिवसाचे बाळ.

औरंंगाबाद :- भिख मागण्यासाठी घाटी रूग्णालयातून एक दिवसाचे बाळ चोरून नेणाऱ्या महिलेला बेगमपुरा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या चार तासात गजाआड केले. घाटी रूग्णालयातून बाळाची चोरी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. कविता संतोष मुगदल (रा.आडगाव, ता.औरंगाबाद) असे घाटी रूग्णालयातून बाळ चोरून नेणाऱ्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली दिगंबर हारणे वय 28, रा. नेवासा, जि.अहमदनगर, ह.मु.लिंबेजळगाव या महिलेला प्रसुतीसाठी 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोनाली हारणेची प्रसुती 22 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास होवून तीने एका मुलाला जन्म दिला होता. सोनाली हारणे हिला 30 नंबरच्या वॉर्डात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी सोनाली हारणे या आपल्या नवजात बाळाला गादीवर झोपवून स्वच्छतागृहात गेल्या होत्या.
परत आल्यावर त्यांना बाळ गादीवर न दिसल्याने त्यांनी आजू-बाजूच्या लोकांना आणि वॉर्डातील परिचारीकांना विचारणा केली. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या दोन परिचारीकांनी एक महिला बाळाला घेवून जात असतांना बघितले असल्याचे सांगितले.
दरम्यान, सोनाली हारणे व तीच्या नातेवाईकांनी घाटी रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज बघीतले असता बाळाला चोरून नेणारी महिला रिक्षा क्रमांक (एमएच-20-एफ-3162) मध्ये बसून जातांना दिसली. पोलिसांनी रिक्षाचालक उस्मान खान याला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने सदरील महिलेला जाफरगेट परिसरातील तक्षशिला नगर येथे सोडले असल्याचे सांगितले. बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक गात व त्यांच्या पथकाने तक्षशिलानगरात शोध घेवून कविता मुगदल हिला मिनाबाई सांडू बिरारे यांच्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही.बी.कापसे करीत आहेत.








