आदर्श शिक्षक युवक बिरादरी (भारत) सामाजिक युवा चळवळीतचे प्रा. विजय लुंगे यांचे निधन.

प्रतिनिधि 25 फेब्रुवारी
अमरावती:- गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले प्रा.विजय लुंगे यांचे शहरातील बेस्ट हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान आज सायंकाळच्या सुमारास निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेत प्रा. विजय लुंगे यांनी अनेक वर्षे शैक्षणिक सेवा दिली. ते आदर्श शिक्षक देखील होते. यासोबतच युवक बिरादरी (भारत) या सामाजिक युवा चळवळीत पद्म क्रांती शाह यांच्या समवेत अनेक वर्षे त्यांनी युवकांच्या विविध उपक्रमात योगदान दिले आहे. राठी नगर येथील ज्ञान प्रबोधिनी वाचनालय तसेच मेळघाटातील आदिवासींच्या सेवेत कार्य करणाऱ्या स्पर्श प्रतिष्ठान या संस्थांचे ते संस्थापक आहेत. एकूणच त्यांचे जीवन हे सदैव समाजासाठी समर्पित होते. बिहाली येथे आदिवासींच्या कल्याणार्थ बांबू वन, जीवन संस्कार केंद्र आणि आदिवासी महिलांसाठी सोलर चरखा केंद्र स्थापन करून त्यांनी आपले संपूर्ण जीवन आदिवासी बांधवांच्या सेवेत घालविण्याचा निर्धार केला होता. दरम्यान त्यांना दीर्घ आजारामुळे शहरातील बेस्ट हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा या दरम्यान आज मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, दोन मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर गुरूवारी सकाळी हिंदू स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
बिरादरीचा आधारस्तंभ हरविला – पद्मश्री क्रांती शाह संस्थापक, युवक बिरादरी (भारत)
गेल्या 45 वर्षांपासून युवक बिरादरीला साथ करत बहुजनांच्या कल्याणार्थ झटत राहणारे एक तरूण मनाचे व्यक्तीमत्व विजय लुंगेंच्या रूपाने आम्ही हरविले आहे. विदर्भात युवक बिरादरीच्या स्थापनेपासून गांधी आणि फुल्यांच्या विचारांना आदर्श मानून युवक आणि आदिवासींच्या कल्याणार्थ सेवाकार्य करणारा एक साथी, आमचा आधारस्तंभ आज हरविला आहे. विजय लुंगेंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.