गरजूंना लाभ देणे तुमची जबाबदारी…
प्रामाणिकपणे काम करा
खा. सुनील मेंढे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
4
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा: -शासनाच्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रशासनातील विभागांचे आहे. अधिकाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करून योजनेचा लाभ मिळवून द्यावा. प्रसंगी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी तयार रहावे असे खासदार सुनील मेंढे यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती म्हणजेच दिशा ची बैठक खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली 24 फेब्रुवारी रोजी नियोजन भवनात पार पडली. यावेळी खासदारांनी विविध विषयांचा विस्तृत आढावा घेत प्रसंगी अधिकाऱ्यांना जाबही विचारला. पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मिळावा म्हणून कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समन्वयातून सकारात्मक कारवाई करावी. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतीशी संबंधित सर्व योजना शेतकऱ्यांना व्यवस्थित समजावून सांगण्यासाठी नियोजन करावे तसेच पिक विमा कंपनीचा एक कर्मचारी कृषी कार्यालयात नेहमी ठेवण्याच्या दृष्टीने व्यवस्था करावी अशी सूचनाही खासदारांनी केली. मुद्रा लोन घेताना अनेक होतकरू तरुणांना अडचणी येत आहेत. यासाठी असलेल्या अटी शिथिल करून नवउद्योजकांना प्रेरणा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. एका सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात होत असलेल्या रेती चोरीवर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे निर्देश यावेळी खासदार मेंढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. रेती घाटाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यासह सीईओ विनय मून, सदस्य विनोद बांते, प्रशांत खोब्रागडे, महेंद्र शेंडे, प्रकाश करंजेकर, डॉ.शांताराम चाफले, मा.भोजराम कापगते, मा. विलास डहारे,सौ.माधुरीताई नखाते, मा.सेलोकर मॅडम, मा.बिसन सयाम, मा.प्रकाश कुर्झेकर, मा.हिरालाल वैद्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानझडे व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.