सकारात्मक विचार करुन परीक्षा द्या!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
फेब्रुवारी मार्च महिना म्हटलं की परीक्षांचा हंगाम. दरवर्षी याच दोन महिन्यात परीक्षा होतात. दहावी बारावी या बोर्डाच्या परीक्षाही याच काळात असतात. इतकेच काय तर शिष्यवृत्ती, नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षाही याच काळात होतात. इयत्ता ५ वि आणि ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा नुकत्याच पार पडल्या. बारावीची परीक्षाही २१ फेब्रुवारी पासून सुरू झाल्या असून दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च दरम्यान आहे. या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड असतो.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या परीक्षा असतात म्हणूनच या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनात अतिशय महत्वाच्या असतात. दहावी बारावीची बोर्ड परीक्षा म्हणजे विद्यार्थी आणि पालकांसाठी कमालीचे टेन्शन. करियरच्या दृष्टीने आणि पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बोर्ड परीक्षेच्या गुणांना खूप महत्व असते. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर भरपूर अभ्यास करत असतात. पण प्रत्यक्ष जेंव्हा परीक्षा जवळ येते तेंव्हा मात्र विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढते. ते साहजिकच असले तरी या काळात विद्यार्थ्यांनी टेन्शन फ्री राहणे महत्वाचे आहे कारण नकारात्मक विचार घेऊन जर विद्यार्थी परीक्षेला गेला तर त्याचा विपरीत परिणाम होऊन वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी पडू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत प्रसन्न रहावे.
सतत अभ्यास करण्याऐवजी मध्येमध्ये ब्रेक घेऊन थोडा वेळ टीव्ही पाहणे, संगीत ऐकणे, लहान मुलांशी खेळणे, बाहेर फिरून येणे, मित्रांशी अभ्यासाव्यतिरिक्त इतरही विषयांशी चर्चा करणे, गप्पा मारणे, चित्र काढणे, आवडती पुस्तके वाचणे अशा गोष्टी कराव्यात. रात्री जागरण करणे टाळावे. विद्यार्थ्यांनी परीक्षा कालावधीत मोबाईलपासून दूरच राहावे. वेळेवर झोपून वेळेवर उठावे. अभ्यासाचा खूप ताण आल्यास विश्रांती घ्यावी. या काळात शक्यतो बाहेर खाणे टाळावे. घरी बनवलेले जेवण वेळेवर करावे.
पालकांनीही याकाळात सकारात्मक राहावे. आपल्या पाल्यांवर अभ्यासासाठी दबाव आणू नये. त्याला सतत परीक्षेची आठवण करून देऊ नये. त्याच्याशी हसून खेळून प्रेमाणे वागावे. पालकांनी स्वतःही परीक्षेचे टेन्शन घेऊ नये आणि मुलांनाही देऊ नये. जर विद्यार्थी परिक्षेचे टेन्शन न घेता सकारात्मक विचार घेऊन परीक्षेला गेला तर यश निश्चित मिळेल. दहावी बारावीच्या परीक्षा आयुष्यातील महत्वाचा टप्पा असला तरी शेवटचा टप्पा नाही त्यामुळे टेन्शन फ्री राहा. मन शांत ठेवून प्रश्नपत्रिका सोडवा. यश नक्की मिळेल. सर्व विद्यार्थी मित्रांना या बोर्ड परीक्षांसाठी मनापासून शुभेच्छा! ऑल दि बेस्ट…