बल्लारपूर शहराला बायपास रोड द्या:- राजु झोडे
शहरातील रस्त्याने मोठी वाहतूक होत असल्याने अपघाताचे व वाहनांच्या वर्दळीचे प्रश्न गंभीर
✍सौ हनिशा दुधे✍
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
97642 68694
*बल्लारपूर:-* बल्लारपूर शहराची मुख्य बाजारपेठ मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर असल्याने नेहमी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सदर रस्त्यावरून मोठे मोठे मालवाहतूक व ट्रक तसेच इतर मोठी वाहने जात असल्याने नेहमी रस्त्यावर वाहतूक जाम होऊन वाहतुकीस अडथळा तयार होत असतो. रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून आठवड्यातून किमान एक तरी मोठा अपघात होऊन या ठिकाणी जीव जात आहे.त्यामुळे बल्लारपूर शहराला बायपास रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी संबंधित प्रशासनाकडे केली.
बल्लारपूर शहर हे जिल्ह्यातील मोठे शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक क्षेत्र असल्याने या शहरातून प्रचंड प्रमाणात मोठमोठे वाहने वाहतूक करीत असतात. परंतु शहरातील मुख्य बाजारपेठ हे रस्त्यालगतच असल्याने नेहमी या रस्त्यालगत लोकांची वर्दळ सुरू असते.बल्लारपूर पेपर मिल रस्त्याच्या कडेलाच मोठमोठी वाहने पार्किंग साठी लावल्याने वाहतुकीस प्रचंड अडथळा तयार होत असतो. यामुळे कित्येक अपघात होऊन जीवही गेले आहेत. काल परवाच एका तरुण होतकरू युवकांचा मृत्यू अपघातात झाला. बल्लारपूर शहरालगत मोठमोठ्या उद्योगपती व भांडवलदार लोकांच्या जमिनी असल्याने शहरातील बायपास मार्गाला मूठमाती देण्याची काम प्रशासन करीत आहे. उद्योगपती व भांडवलदार पैशाच्या बळावर प्रशासनाला हाताशी घेऊन बायपास मार्ग लांबणीवर नेत आहेत. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी केला. शासन व प्रशासन पुन्हा किती लोकांचे जीव जाण्याची वाट बघत आहे असा प्रश्नही उपस्थित केला. त्यामुळे लवकरात लवकर बल्लारपूर शहराला मुख्य बायपास देण्यात यावा व शहरातील वाहतुकीची वर्दळ कमी करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी द्वारा संबंधित प्रशासनास निवेदन देण्यात आले.
वरील मागणी ही शहराच्या व लोकांच्या हिताची असून तात्काळ पूर्ण करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी या विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदन राजू झोडे, संपत कोरडे, आबाजी देखकर, स्वप्निल सोनटक्के, सचिन थिपे, सिद्धांत पुणेकर, बादल बोबडे, संजय सूर्यवंशी ,जाकिर खान तथा अन्य कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिले.