खुशखबर…! पत्रकारांना आता करता येणार सरकारी नोकरी…सरकारने केली ही योजना सुरू

जितेंद्र कोळी 

पारोळा प्रतिनिधी 

मो: 9284342632

मुंबई -राज्यातल्या पत्रकारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील रिक्त पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी असणाऱ्या शैक्षणिक अर्हतेत बदल केले गेले आहेत. यानुसार शुक्रवारी २१ एप्रिलला शुध्दिपत्रक प्रसिध्द केले असून नवीन बदलानुसार जर्नालिझम विषयात पदवी तसेच पदविकाधारकांसोबत आता पदव्युत्तर पदवीधारकांनाही अर्ज करता येणार आहे.

 

यापूर्वी जर्नालिझम विषयात पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या उमेदवारांना अर्ज करता येत नव्हता. मात्र १७ एप्रिलला (सोमवार) ‘डिप्लोमा, डिग्री चालते, मग पोस्ट ग्रॅज्युएट का नाही, ही बातमी आल्यानंतर यामध्ये बदल करण्यात आले. यानुसार राज्य शासनाने शैक्षणिक अर्हतेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये जर्नालिझम विषयात पदव्युत्तर पदवी आणि पदविकासह एकूण १६ अर्हतेचा नव्याने समावेश केला आहे.

 

दरम्यान, राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागातील माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, जनसंपर्क अधिकारी यासह इतर पदांसाठी एमपीएससीद्वारे ३० डिसेंबर २०२२ रोजी जाहिरात प्रसिध्द केली गेली होती. मात्र, शैक्षणिक पात्रता अर्हता निकषामुळे अनेकांना अर्ज करण्यात तांत्रिक अडचणी येत होती. त्यानंतर १० एप्रिलला नव्याने शुध्दिपत्रक प्रसिद्ध केले. त्यामध्ये पुन्हा मास कम्युनिकेशन, जर्नालिझम, फिल्म टेलिव्हिजन आणि न्यू मीडिया विषयात पदवी तसेच पदव्युत्तर पदविका आदी १६ प्रकारच्या शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या नव्या बदलामुळे आता पत्रकारितेमधील अनेक उमेदवारांना याचा फायदा होणार असून, यासाठी अर्ज करण्याची उमेदवारांना पूर्वी २५ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र नवीन शुध्दीपत्रकानुसार शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आले असून अर्ज करण्यासाठी ८ मे पर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here