जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान

रत्नाकर पाटील

रायगड ब्यूरो चीफ

९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यात १ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात लोकसहभागातून या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा शुभारंभ १ मे रोजी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत गट विकास अधिकारी हे पंचायत समिती स्तरावर ग्रामपंचायत अधिकारी यांची कार्यशाळा व बैठक घेतील. त्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी हे ग्रामस्थांना माहिती देतील. तसेच गावात दवंडी दिली जाईल. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे सूचना फलकावर माहिती प्रसारित करण्यात येईल.‌ १ मे ते १० मे या कालावधीत गावातून संकलित केलेला ओला कचरा कंपोस्ट खड्ड्यात भरण्यात येईल. त्यापासून खत निर्मिती नंतर १५ सप्टेंबर पर्यंत कंपोस्ट खड्ड्यात तयार झालेले खत उपसण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

कंपोस्ट खड्ड्यांची पडताळणी करण्यासाठी जिल्हा स्तर तसेच तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे यांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
……………….