स्विमिंग पूलमध्ये बुडून ४ वर्षीय अतिक्षाचा मृत्यू…

स्विमिंग पूलमध्ये बुडून ४ वर्षीय अतिक्षाचा मृत्यू…

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झिराड पाडा येथे गुरुवारी संध्याकाळी दुर्दैवी घटना घडली, हद्दीतील झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्म हाऊस मधील स्विमिंग पूलमध्ये पडून चार वर्षाच्या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, झिराडपाडा येथील तसविंदर सिंग यांच्या फार्म हाऊस मध्ये सुरेंद्रकुमार अशोक दास (वय२८) मूळ रा. जि. रामगड, राज्य झारखंड, हा केअर टेकर म्हणून आपली पत्नी निकीताकुमारी व चार वर्षीय मुलगी अतिक्षा(वय ४) हिच्यासह बंगल्यात राहत होता, गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारच्या सुमारास मुलगी आपल्या वडिलांसोबत खेळत होती, त्याचवेळी बंगल्यात पाण्याचा टँकर आल्याने मुलीला सोडून टँकर खाली करण्यासाठी गेले, थोड्या वेळाने आल्यानंतर त्यांनी पत्नीला मुलगी कुठे आहे असे विचारले, तेव्हा पत्नीने मुलगी तुमच्या सोबत होती, असे सांगितले व ते मुलीला शोधत असताना त्यांना मुलगी स्विमिंग पुलच्या पाण्यात तरंगताना दिसली. त्यांनी वेळ दवडता लगेच मुलीला पाण्यातून बाहेर काढली असता मुलगी बेशुद्धावस्थेत होती. दोघा पती पत्नीने मुलीला घेऊन चोंढी येथील डॉ. आर. के. पाटील यांच्या रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
याबाबतची माहिती किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांना समजताच त्यांनी आपल्या रुग्णवाहिकेतून मुलीला त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी मुलीला तपासले असता ती मृत झाल्याचे सांगितले. याबाबतची नोंद मांडवा सागरी पोलिसांनी घेतली असून अधिक तपास मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अक्षय पाटील हे करत आहेत.