अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चोराचा प्राणघातक हल्ला.

निगडी, पुणे – चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोराने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. आज मंगळवारी, दि.25 सकाळी साडे सातच्या सुमारास निगडी प्राधिकरण याठिकाणी सोनाली कुलकर्णी हिच्या ‘वरलक्ष्मी’ या राहत्या घरी ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांच्या हाताला टाके पडले आहेत.
या प्रकरणी सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर गणपतराव कुलकर्णी वय 55, रा. प्राधिकरण, निगडी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
‘वरलक्ष्मी’ या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी एक चोरटा चाकू, प्लास्टिकची पिस्तुल घेऊन इमारतीच्या आत घुसला. त्यानंतर समोर आलेल्या एका महिलेवर त्याने स्प्रे मारला. त्यानंतर हा चोरटा दुसऱ्या मजल्यावर गेला याठिकाणी सोनाली कुलकर्णी यांचे कुटुंबीय राहतात. सोनाली कुलकर्णीचे वडील व चोर यांच्यात धरपकड झाली. यावेळी चोराने त्यांच्यावर धारधार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हताला गंभीर जखम झाली.
सुरक्षा रक्षकाने तात्काळ शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमित गावडे यांना फोन करून घडलेली हकीकत सांगितली. नगरसेवक अमित गावडे यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव अजय विष्णू शेट्टे वय 24, रा. बिड आहे. आपल्या मागे पोलीस लागले होते म्हणून घाबरून पळत होतो, असे त्या चोरट्याने पोलिसांना सांगितले आहे.