*वाघाच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या पतीला शोधण्यात यश
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351
मंगळवारी सकाळी चिमूर तालुक्यातील केवाडा येथील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या एका दांपत्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. मिना विकास जांभूळकर आणि विकास जांभूळकर असे पती-पत्नीचे नाव आहे. या हल्ल्यात पत्नीला वाघाने ठार केले. तर जखमी अवस्थेत विकास बेपत्ता होता. अखेर आज घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरील डोंगराळ भागात विकास गंभीर जखमी अवस्थेत बेशुद्ध आढळून आला. त्याला उपचारार्थ चिमूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. चिमूर तालुक्यातील केवाडा येथील रहिवासी विकास जांभूळकर हे पत्नी मिना यांचेसह तेंदूपत्ता तोडण्यासाठी गावापासून एक किमी अंतरावरील कक्ष क्रमांक ३४ मध्ये मंगळवारी सकाळी गेले होते. सोबत काही लोकही तेंदुपत्ता तोडावयास गेले होते. जंगलात सगळे लोक तेंदूपत्ता तोडण्यात मग्न होते. जांभूळकर दाम्पत्य एकमेकांसोबत राहून तेंदुची पाने तोडत होते. विकासला डोळ्याला अंधूक दिसत असल्याने पती-पत्नी दोघेही सोबत होते. दरम्यान जवळच जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने या दोघांवर हल्ला केला. यात पत्नी मिनाला वाघाने जागेवरच ठार केले यालाही वाघाने डोक्यावर पंजा मारून गंभीर जखमी केले. विकासने तेथून कशीबशी आपली सुटका केली. पण घटनास्थळी तो मिळाला नाही. गावकऱ्यांनी व वनविभागाच्या चमूने शोधमोहिम राबवली असता त्यांना यश आले नाही. बुधवारी पुन्हा शनेरी वनविभागाचे क्षेत्रसहायक रासेकर, वनरक्षक नागरे, पिआरटी चमू व स्थानिक नागरिकांनी के़वाडा जंगलात कक्ष क्रमांक ३४ मध्ये सकाळपासून शोधमोहीम राबविली. काल घडलेल्या घटनास्थळापासून तब्बल दिड कि.मी अंतरावर डोंगराळ भागात पिआरटी चमूचे विनोद चौधरी व सतीश बावणे यांना विकास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तपासणी केल्यानंतर तो जिवंत असल्याचे लक्षात आले. डोक्यावर वाघाने पंजाचा वार केल्याने तो बेशुध्द झाला होता. सध्या त्याच्यावर चिमूर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत.