वाघाच्या हल्ल्यात ४ महिला ठार; वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर, २२ मे: सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केल्याची थरारक व दुर्दैवी घटना आज घडली. या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मानवी-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला असून संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच ‘भूमिपुत्र ब्रिगेड’च्या अध्यक्षा डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आणि पीडित कुटुंबांची भेट घेतली. वनविभागाच्या नाकर्तेपणामुळेच निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.
२५ लाखांचा धनादेश घ्या आणि वाघाला सामोरे जा!
प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत डॉ. गावतुरे यांनी मुख्य वनसंरक्षकांना थेट आव्हान दिले. आपल्या स्वतःच्या चेकबुकमधून २५ लाख रुपयांचा चेक काढत त्या म्हणाल्या, “जर आमच्या गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या आणि ग्रामीण जनतेच्या जीवाची किंमत सरकार २५ लाख रुपये लावत असेल, तर हा २५ लाखांचा चेक तुम्ही घ्या आणि स्वतः वाघाच्या समोर जाऊन दाखवा. तुमच्याही जीवाची किंमत आम्ही २५ लाखच देऊ.
सिंदेवाही पोलीस स्टेशनवर धडक; गुन्ह्याची मागणी
या घटनेनंतर डॉ. गावतुरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी सिंदेवाही पोलीस स्टेशनवर धडक दिली. वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी मुल तालुक्यातील चिचोली येथील घटनेतही अशीच तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे त्यांनी सांगितले
• रिक्त जागा आणि व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
एकीकडे ताडोबाच्या सुशोभीकरणासाठी आणि प्रवेशद्वारांसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र स्थानिक लोकांच्या सुरक्षेसाठी वनरक्षकांची पदे भरली जात नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनविभागात निम्म्याहून अधिक जागा रिक्त असून कंत्राटी पद्धतीने काम चालवले जात आहे. यामुळे स्थानिक तरुण बेरोजगार आहेत आणि नागरिक वाघांच्या दाढेत सापडत आहेत.
दोषी वन अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी, संवेदनशील वनक्षेत्रात सौर कुंपण आणि प्रभावी विद्युतीकरण करावे, वनरक्षकांची रिक्त पदे कायमस्वरूपी त्वरित भरावीत या त्यांच्या मागण्या आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर शासनाने त्वरित ठोस पावले न उचलल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भूमिपुत्र ब्रिगेड व ग्रामस्थांनी दिला आहे.









