एका शेतकऱ्याची साद: अरे, पावसा तू लपलास तरी कुठे…?

58

अरे, पावसा तू लपलास तरी कुठे…?

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु. कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

 मृगही कोरडा गेला अन् दुसरा नक्षत्र लागण्याची वेळ आली तरी अजून तुझा पत्ता दिसत नाही नेमकं तू गेलास तरी कुठे. .? आज मी बळीराजा तुला विचारत आहे. जेव्हा तुझी गरज नसते तेव्हा तू आपल्या मनाने सतधार पडत असतोस अन् आज तुझी गरज आहे तर..तू लपलास..? हा हंगामाचा सिझन आहे आज जर..मी शेतात पेरणी केली नाही तर..खाणार तरी काय…? दिवसेंदिवस तुझ्या ह्या खेळामुळे मी कंटाळून गेलो आहे वरतून माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे सोबतच बऱ्याच अडचणी माझ्या जीवनात आहेत हेच तुला मी वारंवार सांगत बसू का. .? की,अजून कोणाला सांगत फिरू ही वेळ हंगामाची आहे दरवर्षी या दिवसात मी माझ्या शेतात पेरणी करत होतो, धुरे पालवत होतो पण,या वर्षी तुझा पत्ताच दिसत नसल्यामुळे मी कर्मचारी असल्यासारखं घरी बसून आहे जर.असाच बसत राहिलो तर..मला कोणी महिना भरला तर.. पगार देणार आहे का. ..?

अरे,माझे जगणेच जगापेक्षा वेगळे आहे मी द्यायलाच शिकलो घ्यायला नाही म्हणून कदाचित तू सुध्दा माझी परीक्षा घेत असशील नाही का..? घे, बाबा घे, माझी परीक्षा‌ अरे,सारेच माझी परीक्षा घेत आहेत पण, मी मात्र प्रत्येक परीक्षा दररोज देत असतो तेही न घाबरता पण आज काय करू निदान तू तरी कोपू नकोस रे आज तुझ्या न येण्याने मला चिंता सतावत आहे कारण इतरांच्या घरी बायको, मुले आहेत तसेच माझ्या घरी आई,बाबा,बायको, मुले एवढा कुटूंब आहे आणि त्यांचे पालणपोषण करण्यासाठी मला शेती केल्याशिवाय कोणताच पर्याय नाही. 

     जर आज मी हार मानून मेलो तर माझ्या कुटुंबाला पोसणारा कोणीच नाही रे, ही बळीराजाची आर्त हाक आहे ती ऐकून घे, काय करू मी आणि काय नाही आज असचं वाटत आहे शेतावर जाण्याची इच्छा होत नाही एवढी कडक उन्ह आज पडत आहे हे तुला दिसत नाही. तू कुठे पडतोस ,कुठे पडत नाही मला वाटते इतरांन सारखं माझ्यासोबत भेदभाव करतेस की,काय असंच वाटत आहे. म्हणून कुठेतरी आज असं वाटते की तू आणि शासनाने एकमत केले असावे म्हणूनच तर.. तू लपलेला आहेस पण,पावसा एवढेही लपू नको रे,मी तुझं तर..काय कोणाचचं वाईट केलं नाही म्हणून मला जगाचा पोशिंदा म्हणतात माहीत आहे ना तुला. ..?

 

पण,फक्त पदवी पुरता मी मर्यादित राहिलो आहे व जय जवान जय किसान नारे देण्यासाठीच मी महान झालो आहे. बाकी तुझ्या सारखेच दिखावूपणा करणारे, दाखवणारे व माझ्याकडे पाठ फिरवणारे टपून बसलेले आहेत म्हणून माझा विकास होत नाही. म्हणून माझे कितीतरी मित्र गळफास घेऊन आत्महत्या केली आहे करत आहे व कोणी पोटासाठी वणवण भटकत फिरत आहे मात्र त्याकडे लक्ष दिल्या जात नाही त्यामुळे बळीराजाची भयानक परिस्थिती आज निर्माण झालेली दिसत आहे. म्हणून तू तरी असा करू नकोस,रे डोळे वटारून बसू नकोस एकदा तरी येरे पावसा अन् माझ्या शेतात पेरणी करू दे,सकाळी उठतो अन् आभाळाकडे बघतो तर नुसती कडक उन्ह पडत असते तेही एकसारखी संध्याकाळ होई पर्यत अशाने कसं होईल रे, एवढा माझा अंत बघू नकोस येरे पावसा ये, माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत बघं तरी तुला चांगल्या प्रकारे दिसतच आहेत.

आज माझ्या जीवनात एवढे संकट , प्रसंग तसेच विजेचा वाढता बील ,माझ्या मालाला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही मग तूच तरी सांग एवढ्या गोष्टी माझ्या सोबत घडत असतात तेव्हा का बरं मला न्याय मिळवून देण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. माझ्यासाठी आंदोलन करत नाही म्हणजे तुझ्या सारखेच ते सुद्धा स्वार्थी झाले म्हणावे लागेल.

आज तुझा पत्ता दिसत नाही पण,मला असं कोणी विचारत नाही की, अरे भाऊ तू कसा आहेस बघं पावसा आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे .उद्या तर..मला कोणी ओळखायला सुद्धा तयार होणार नाही मग मी कोणाकडे न्याय मागायला जाऊ. .? पावसा असं नको करू आता तरी ये मलाही जगायचं आहे आणि या जगाला सुध्दा जगवायचं आहे भलाही त्यांनी माझा विचार नाही केला तरी चालेल पण,मी मात्र सर्वांचा विचार करत असतो.