कडाव बसथांबा वाद पेटला!; कडाव बसथांबा बळकावल्यावर पत्रकारांचा संताप;
ग्रामपंचायतीवर धडक देत बेमुदत आंदोलनाचा इशारा
संदेश साळुंके
कर्जत रायगड
९०१११९९३३३
कर्जत :- कर्जत तालुक्यातील कडाव गावात एसटी बसथांबा बेकायदेशीररित्या बळकावून तिथे अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी सोमवारी (ता.२४) कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत २ जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा १० जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. या विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने आवाज उठवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना धमक्या दिल्याची बाबही पुढे आल्याने संताप आणखी वाढला आहे.
कडाव गावात १९७७-७८ साली एसटी महामंडळाने अधिकृत बसथांबा बांधला होता. परंतु आता विनोद काशिनाथ पवाळी, रमेश मारुती पवाळी आणि उमेश यशवंत ऐनकर या तिघांनी संगनमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची तक्रार कर्जत एसटी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. उलट ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
या निषेध आंदोलनात प्रभाकर गंगावणे,संतोष पेरणे, नरेश जाधव, भूषण प्रधान, कैलास म्हामले, रमाकांत जाधव, महेश भगत, कृष्णा सगने, किशोर गायकवाड, मोतीराम पादिर, रजनीकांत पवाळी, अजय गायकवाड, गणेश पवार, सतीश पाटील, आनंद सकपाळ, गणेश मते, जगदीश दगडे, , कांता हाबळे, रोशन दगडे, गणेश लोट, नरेश कोलंबे यांच्यासह अनेक पत्रकार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी ग्रामपंचायतीकडे जोरदार निषेध नोंदवत अनधिकृत बांधकाम तत्काळ हटवण्याची ठाम मागणी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात २ जुलै २०२५ पर्यंत कारवाई न झाल्यास १० जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. उपस्थितांनी एकमुखीने सांगितले की, सार्वजनिक सुविधांवर बेकायदेशीर अतिक्रमण हा सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आहे आणि प्रशासनाने याप्रकरणी ठोस भूमिका घेतली पाहिजे.
########################
गेली दहा वर्ष कडाव ग्रामपंचायत आणि एसटी डेपो यांना अनधिकृत बस थांबाबाबत पत्रव्यवहार करीत असूनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही.वेळीच दखल घेतली असती तर अनधिकृत गाळा उभारणाऱ्या व्यक्तींपैकी विनोद पवाली नामक व्यक्तीने मला धमकी देण्यापर्यंत त्याची मजल गेली नसती. प्रशासनाने १० जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यास आम्ही सारे पत्रकार बांधव कडाव ग्रामपंचातसमोर बेमुदत उपोषण करणार आहोत.
प्रभाकर गंगावणे, सल्लागार, कर्जत प्रेस असोसिएशन , संपादक रायगडचे वादळ