आरे वाचवा आंदोलनाला देशव्यापी पाठिंबा
पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. 8149734385
जोगेश्वरी :- आरेतील मेट्रो- ३ कारशेडच्या उभारणीवरील स्थगिती शिंदे व फडणवीस सरकारने उठवल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून याला तीव्र विरोध होताना दिसत आहे. दि.२४ जुलै २०२२ पुन्हा एकदा आरेमध्ये पर्यावरणप्रेमीनी सरकारच्या निर्णयाचा तीव्र विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.
आज आरेसाठी ९ राज्यांमध्ये १३ ठिकाणी देशव्यापी निदर्शने करण्यात आली. देशाच्या विविध राज्यांतील शहरांमधील तरुण पर्यावरणप्रेमीच्या समूहांकडून आणि नागरिकांकडून सर्वत्र निदर्शने केली जात आहेत. सहभागी समूहानी देशाच्या विविध भागामध्ये शांततापूर्ण मार्गाने निषेध व्यक्त केला. आंदोलकांनी विविध माहितीपूर्ण भित्तीपत्रकांच्या माध्यमातून आरेतील हरितपट्टा आणि तेथील जैवविविधतेविषयी जनजागृती केली. आंदोलकांनी आरेतील मेट्रो-३ कारशेडचे बांधकाम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मागे घेण्याचे आणि कारशेड पर्यायी जागेवर हलवण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील हा निषेध ‘ रविवार आरेकरीता ‘ या नावाने दर रविवारी मुंबईतील रस्त्यांवर व्यक्त केला जाईल. बहिऱ्या कानांपर्येंत आंदोलकांचा आणि आदिवासी समुदयाचा आवाज सरकारपर्येंत पोहोचवण्यासाठी व्यक्त केल्या जात असलेल्या निषेधाचा हा चौथा आठवडा आहे. आज निषेध व्यक्त करणाऱ्या संस्थापैकी फ्रायडेस फॉर फ्युचर मूव्हमेंट, क्लायमेंट फ्रंट इंडिया व इतर गट सहभागी होते. आरे बचावसाठी मुंबईसह नागपूर, हैद्राबाद, आदिलाबाद, आग्रा, गुडगांव, ग्रेटर नोएडा, पाटणा, जम्मू, चंदीगड, तेलंगणा, हरियाणा आणि उज्जैन या ठिकाणाहून निदर्शने करण्यात आली.
आरे संवर्धन समुहाच्या सदस्या आणि सर्वोच्च न्यायालयातील याचिकाकर्त्या अमृता भट्टाचार्जी म्हणाल्या की, ” सर्वोच्च न्यायालयाने आरेतील वृक्षतोडीवर स्थागिती आणली आहे आणि तरीही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारून सरकारने आरेमध्ये मेट्रो-३ कारशेडच्या बांधकामाला सुरुवात केली, तर तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान तर ठरेलच, शिवाय त्यामुळे फक्त आणि फक्त जंगलाचा नाश होईल. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आरेचे जंगल हे वन्यजीव अधिनियम, १९७२ मधील अनुसूची १ मधील ५ बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. त्यामुळे, सरकारने कारशेडच्या उभारणीकरता पर्यायी जागेचा विचार करावा की जेणेकरून या वन्यजीवांचा आणि आदिवासीचा अधिवास अबाधित राहील. ”
भारतीय नागरिकांनी सरकारला हे निक्षुण सांगितले आहे की, जर आरेतील जंगलाचा बळी देऊन मेट्रो-३ कारशेड उभारण्याच्या निर्णयावर सरकार ठाम असेल तर त्याविरोधात हे आंदोलन वाढतच जाईल. मुंबईतील आरेच्या पर्यावरणप्रेमीनी काल मानखुर्द भागात आंदोलन केले. आणि येत्या दोन दिवसात घाटकोपरमध्ये आणि मुंबईच्या विविध भागामध्ये, मेट्रो आणि लोकल ट्रेन मध्येदेखील हे आंदोलन करण्यात येईल, असे आरेतील उपस्थित पर्यावरणप्रेमीनी सांगितले.