रायगड जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली

रायगड जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरली

नदी, नाले ओसंडून वाहू लागले; 23 धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सतत सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, नदी, पाण्याने भरली आहेत. जिल्ह्यातील कोलाड येथील लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणारी धरणे फुल्ल झाली आहेत. रोहा, म्हसळा, महाड, सुधागड, खालापूर, तळा, मुरुड, पेण, कर्जत, पनवेल, श्रीवर्धन, या तालुक्यांतील 23 धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला आहे. धरणांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

गेली कित्येक दिवस पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली होती. परंतु, गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार सुरूवात केली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून नदी, तलाव, विहिरीदेखील पाण्याने भरल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांसह कारखान्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ध जलसाठा वाढू लागला आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणे आहेत. या धरणांद्वारे ग्रामीण व शहरी भागात पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात धरणांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. धरणांतील पाण्याची पातळी वाढल्याने पाण्याचा पुरवठा ही मुबलक प्रमाणात होऊ लागला आहे. रोहा, म्हसळा, महाड, सुधागड, खालापूर, तळा, मुरुड, पेण, कर्जत, पनवेल, श्रीवर्धन या तालुक्यातील सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, कोंडगांव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कलोते-मोकाशी, डोणवत, आंबेघर, उसरण, मोरबे, अवसरे बामणोली, ढोकशेत, कुडकी या 23 धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा आहे. कर्जत तालुक्यातील साळोख, श्रीवर्धनमधील कार्ले या दोन धरणांमध्ये 99 टक्के, उरणमधील पुनाडे आणि अलिबागमधील श्रीगाव धरणामध्ये 75 टक्के तसेच श्रीवर्धनमधील रानीवली धरणामध्ये 50 टक्के जलसाठा असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली.

कुंडलिकेने ओलांडली इशारा पातळी

रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री, रोहा येथील अंबा, कुंडलिका, कर्जतमधील उल्ह आणि पनवेलमधील गाढी या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांमध्ये सध्या 3.64 मी. पासून 23.15 मी. जलसाठा आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. धोका पातळीच्या वाटेवर पाण्याची पातळी असल्याचे चित्र आहे. तर उर्वरित पाच नद्यांमध्ये इशारा पातळीपेक्षा कमी जलसाठा असल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभाग पुरनियंत्रण कक्ष अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.