नागपूरात शेकडो घरात दिसून आल्या डेंग्यूच्या अळ्या.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर :- नागपुर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुर महानगर पालिके तर्फे डेंग्यू रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात झोननिहाय सर्वेक्षण सुरू आहे. मंगळवार दि. 24 ऑगस्ट ला 7801 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील 300 घरात डेंग्यू रोगाच्या अळ्या दिसून आल्या आहेत.
याशिवाय 106 ताप असलेले रुग्ण आढळून आले. 147 जणांच्या रक्ताचे नमुने तर 24 जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान 1087 घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात 99 कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. चमूद्वारे 111 कुलर्स रिकामी करण्यात आले. 306 कुलर्समध्ये टेमिफॉस सोल्युशन तर 592 कुलर्समध्ये डिफ्लूबेंज्युरोम गोळ्या टाकण्यात आल्या तसेच 78 कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.
शहरात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरात सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.