चंद्रावर तिरंगा ; शास्त्रज्ञांची ऐतिहासिक कामगिरी…! 

२३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताच्या चांद्रयान ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले आणि इतिहास घडला. चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश बनला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात भारताने चंद्रावर स्वारी केली यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही. भारताची ही चांद्र मोहीम चांद्रयान – ३ या नावाने ओळखली जाते. याआधी भारताने दोनदा चंद्रावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने तो अपयशी ठरला. २००८ साली चांद्रयान १ या मोहिमेस इस्रोने सुरवात केली त्यानंतर चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ साली चांद्रयान २ मोहिमेतील यान चंद्राच्या कक्षेत पोहचूनही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विसंगतीमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यास अपयशी ठरले होते. अर्थात चांद्रयान २ पूर्णपणे अपयशी ठरले असेही म्हणता येणार नाही कारण चांद्रयान २ मोहिमेवेळी पाठवलेले ऑरबीटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे कार्यरत होते. 

या ऑरबीटरवरील काही उपकरणे वापरून चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास केला जात होता. तसेच चंद्र व त्याच्या वातावरणाविषयी नवी वैज्ञानिक माहिती अपल्याला मिळत होती. चांद्रयान ३ हा आधीच्या म्हणजे चांद्रयान २ , मोहिमेचाच भाग आहे. गेल्या वेळी जेंव्हा आपल्याला या मोहिमेत अपयश आले तेंव्हा यानाचा संपर्क तुटला होता म्हणून केवल संपर्क तुटा है…. हौसला नहीं! असे म्हणत देशातील १४० कोटी जनता शास्त्रज्ञांच्या ठामपणे उभी राहिली. देशातील जनतेला देशातील शास्त्रज्ञांविषयी कमालीचा आदर आणि विश्वास आहे याच विश्वासाच्या बळावर आपल्या शास्त्रज्ञांनी आलेले अपयश विसरून नव्याने सुरवात केली. गेल्या वेळेच्या मोहिमेच्या अपयशातून धडा घेत यावेळी शास्त्रज्ञांनी या मोहिमेसाठी पुरेपूर काळजी घेतली होती.

यानातील काही घटक ऐनवेळी कार्यन्वित होऊ शकले नाही तरी यान चंद्रावर यशस्वीपणे उतरेल अशी नव्या यानात रचना करण्यात केल्याची माहिती इस्रोचे संचालक एम सोमनाथ यांनी दिली होती. सेन्सर निकामी होणे, इंजिनमध्ये बिघाड होणे, संगणकातील नियमसंच व गणितीय प्रक्रिया यात होणाऱ्या चुकांची तपासणी करून त्याचे निराकरण करणे यासारख्या बाबींचा विचार करूनच हे यान चंद्रावर झेपावले त्यामुळे यावेळी आपले यान चंद्रावर यशस्वीपणे उतरेलच असा विश्वास देशातील १४० कोटी जनतेला होता. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अखेर हा विश्वास सार्थ ठरवला. चांद्रयान ३ मोहीम ही भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. 

भारताचे हे यान चंद्रावर उतरल्याने चंद्रावर यान उतरवण्यात यशस्वी ठरलेल्या काही मोजक्या देशात भारताचा समावेश झाला. या मोहिमेद्वारे आपल्या देशातील विकसीत तंत्रज्ञान जगाला दाखवण्याची संधी मिळेल. अंतराळ तंत्रज्ञान व उद्योग यांची सांगड घालून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. ही मोहीम यशस्वी झाल्याने भविष्यात चंद्रावर मानव पाठवण्याचे स्वप्न साकार होईल. भारत अंतराळ क्षेत्रात एक महासत्ता म्हणून उदयास येईल एकूणच भारताच्या अंतराळ क्षेत्रात चांद्रयान ३ मोहीम हा मैलाचा दगड ठरणार आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. गेली चार वर्षे शास्त्रज्ञांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रात्रीचा दिवस केला. त्यांच्या या मेहनतीला अखेर यश मिळाले आणि आपली ही चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाली. चांद्रयान ३ मोहीमेसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या आपल्या शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन ! चंद्रावर तिरंगा फडककवून भारताने जगाला दाखवून दिले आहे की अंतराळ क्षेत्रात भारत महासत्ता म्हणून उदयास येत आहे. ७६ वर्षांपूर्वी जेंव्हा भारत इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला तेंव्हा भारत सुईचे टोकही बनवू शकणार नाही अशी आपली हेटाळणी केली जायची. जो देश सुईचे टोकही बनवू शकत नव्हता त्या देशाने आज चंद्रावर स्वारी केली आहे हे भारताच्या आजवरच्या सर्व शास्त्रज्ञांचे आणि सरकारचे यश आहे. या यशाचा देशातील १४० कोटी देशवासीयांना सार्थ अभिमान आहे. ही मोहीम यशस्वी करून चंद्रावर तिरंगा फडकवणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे पुनश्च एकदा अभिनंदन ! जय हो!! 

श्याम ठाणेदार 

दौंड जिल्हा पुणे 

मो: ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here