गणपती विसर्जनाचा ट्रॅक्टर पलटी, महिला ठार, शाळकरी मुलीसह अनेक जण जखमी,काजळसर येथील घटना

50

गणपती विसर्जनाचा ट्रॅक्टर पलटी, महिला ठार, शाळकरी मुलीसह अनेक जण जखमी,काजळसर येथील घटना

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चिमूर, 24 सप्टेंबर: तालुक्यातील काजळसर येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन झाल्यावर मिरवणुकीतील भक्तगण परतत असताना अचानक ट्रॅक्टर पलटी झाला. यात एक महिला जागीच ठार झाली, तर शाळकरी मुलींसह अनेक महिला जखमी झाल्या. ही घटना शनिवार, 24 सप्टेंबरला घडली. प्रेमीला गुलाब श्रीरामे (40) असे मृतक महिलेचे नाव आहे.  

काजळसर येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतीचे शनिवारला मिरवणुकीने विसर्जन करण्यात आले. विसर्जन आटोपून परतत असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत शाळकरी मुली, महिला, पुरुष बसले होते. क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने फॉरेस्ट नाक्याजवळ ट्रॅक्टर अचानक पलटी झाले. यात प्रेमीला श्रीरामे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॉलीत बसलेल्या शाळकरी मुलीसह 27 जण जखमी झाले. यातील 15 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून रुग्णवाहिकेची व्यवस्था केली व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. प्रकृती चिंताजनक असलेल्या जखमींना नागपूरला हलविण्यात आले आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुटल्यावर काही मुली गणपती विसर्जनला गेल्या होत्या. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरचा तुटवडा असल्याने खाजगी डॉ. बोरकर, डॉ. पाटील, डॉ. दिलीप शिवरकर, डॉ. बोढे यांनीसुध्दा उपजिल्हा रुग्णालयात येऊन आपदप्रसंगी सेवा दिली. ट्रॅक्टर मालक अमोल निकोडे व चालक नरेश पेटकुले यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज गभणे करीत आहे.