जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच…

27

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच…

दिवाळीनंतर वाजणार बार?

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या गट व गणनिहाय अंतिम मतदार याद्या 27 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दिवाळीनंतर मतदार याद्या अंतिम होणार असल्याने प्रत्यक्ष निवडणूक नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. तब्बल साडेतीन तीन वर्षाहून अधिक काळ प्रशासक असणाऱ्या रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून लवकरच लोकप्रतिनिधींचा वरचष्मा पहावयास मिळणार आहे. जिल्ह्यातील 59 जिल्हापरिषद गट आणि 118 पंचायत समिती गणामध्ये दिवाळी नंतर निवडणुकीचा धुरळा उडणार असून, प्रचाराच्या मिरवणुकांचे बार वाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिला आहे. त्यानुसार निवडणुकीची प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. त्रिस्तरीय निवडणुकीत 32 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेतली जाईल. त्यानंतर नगरपालिका व अंतिम टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या गटाची व पंचायत समितीच्या गणांची प्रभाग रचना नुकतीच पूर्ण केली आहे. आता मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिला आहे. या निवडणुकांसाठी विधानसभा मतदारसंघाची 1 जुलै 2025 ची मतदार यादी विचारात घेतली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये विधानसभा मतदार संघाची विद्यमान यादी विभाजीत केली जाणार आहे. 8 ऑक्टोबरपर्यंत प्रारुप मतदार यादी तयार करावी. 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी अंतीम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय प्रसिद्ध करावी, असे आयोगाने जिल्हाधिकारी यांना मंगळवारी पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

भंडारा, गोंदीया, मुंबई शहर व मुंबई उपनगर हे चार जिल्हे वगळून राज्यातील 32 जिल्हा परिषदा व त्याअंतगत 336 पंचायत समित्या यांच्यासाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 27 ऑक्टोबरला मतदार यादी व मतदान केंद्रे जाहीर झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तारीख जाहीर केली जाईल. नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडतील, अशी दाट शक्यता आहे.

दरम्यान रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी अध्यक्षपदासाठीची सेटिंग आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुका ‌‘मिनी विधानसभा’ निवडणुका मानल्या जातात. राज्यभरातील ग्रामीण मतदारांचा कौल या निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील बाबी लक्षात घेवून आघाडीत की स्वतंत्रपणे लढवायच्या याचा निर्णय होईल, असे महायुती व महाविकास आघाडीने जाहीर केलेले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राज्याच्या ग्रामीण भागात या निवडणुकांचा मोठाच धुरळा उडणार आहे.