Home latest News सरदार पटेल महाविद्यालयात शांताराम पोटदुखे यांच्या आठवणींना उजाळा
सरदार पटेल महाविद्यालयात शांताराम पोटदुखे यांच्या आठवणींना उजाळा
शांताराम पोटदुखे यांनी मागासलेल्या भागात शैक्षणिक क्रांती घडवली-अरविंद पोरेड्डीवार
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 25 सप्टेंबर
शांताराम पोटदुखे यांनी मागासलेल्या भागात शैक्षणिक क्रांती घडवली. पण आज काळ बदलला आहे, शिक्षणात नवी शैक्षणिक धोरणे आलेली आहेत. त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रात मोठी आव्हाने आहेतच असे प्रतिपादन करीत त्या आव्हानांचा सामना करीत त्यावर मात करत शांतारामजी पोटदुखे यांच्या स्वप्नांची पूर्तता करावी असे आवाहन सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी येथे बोलताना केले.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष तथा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या सातव्या पुण्यस्मरण निमित्त त्यांना येथील सरदार पटेल महाविद्यालयात भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. त्यानिमित्ताने झालेल्या आदरांजली कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.,पी.एम.काटकर, उपप्राचार्य स्वप्निल माधमशेट्टीवार हे उपस्थित होते.
शांतारामजी हे राखून ठेवणाऱ्यांपैकी नव्हते, ते स्पष्ट बोलणारे नेते होते. अपवादात्मक अजातशत्रुता आणि सर्वसमावेशक सहिष्णुता ही त्याच्या स्वभावाची वैशिष्ट्येच म्हटली पाहिजे असे सुदर्शन निमकर म्हणाले.
शांताराम पोटदुखे यांच्या जाण्याने सांस्कृतिक वैभवात मोठी पोकळी निर्माण झाली. ती कधीही भरून निघणार नाही अश्या शब्दात डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी आदरांजली वाहिली. शिक्षण, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणारे संवेदनशील नेता शांतारामजी हे होते. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांचे व्यावसायिकरण होऊ दिले नाही अशा भावना प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे संचालन डॉ शरयू पोतनूरवार यांनी केले. यावेळी ”वैष्णव जन तो तेने कहीए……..“ या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवंगत शांताराम पोटदुखे यांच्या व्यासपीठावरील फोटोला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.