Home latest News पोंभुर्णा हा राज्यातील आदर्श तालुका म्हणून गौरविला जाणार – आमदार सुधीर मुनगंटीवार...
पोंभुर्णा हा राज्यातील आदर्श तालुका म्हणून गौरविला जाणार – आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
• भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरण आदेशांचे वितरण
• संजय गांधी निराधार योजना शाखेच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉटचे लोकार्पण
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर / पोंभुर्णा : 25 सप्टेंबर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवड्याअंतर्गत पोंभुर्णा येथील लाभार्थ्यांना वर्ग 1 चे आदेश व प्रमाणपत्र वाटप आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आले. पूर्वी मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभुर्णा तालुक्याला आज विकासाचा नवा चेहरा लाभला असून, उत्कृष्ट रस्ते, नगरपरिषद इमारत, स्टेडियम, वाचनालय, इको पार्क, वसतिगृह, सिंचन सुविधा आणि पाणंद रस्त्यांसारख्या प्रकल्पांमुळे तालुक्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे पोंभुर्णा तालुका भविष्यात राज्यातील आदर्श तालुका म्हणून गौरविला जाईल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला
पोंभुर्णा तहसील कार्यालयात लाभधारकांना वर्ग 1 च्या आदेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, आदिवासी चळवळीचे जिल्हा संघटक प्रमूख जगन येलके, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,तहसीलदार मोहनीश सेलवटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमडे, सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेंडगे, परीविक्षाधिन तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी नमिता बांगर आदींची उपस्थिती होती.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘17 सप्टेंबर या मोदीजींच्या जन्मदिनापासून ते २ ऑक्टोबर या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवाडा राबविला जात आहे. हे राज्य आणि लोकशाही सर्वसामान्य लोकांचे आहे, या उद्देशाने लोकांच्या प्रश्नांची वेगाने सोडवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या सेवेत तत्पर राहण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.’
भोगवटदार वर्ग 2 मधील प्रलंबित प्रकरणे वर्ग 1 मध्ये रूपांतरणासाठी थांबलेली होती. तत्काळ तहसीलदारांशी संपर्क साधून ही प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि आज वर्ग 2 चे वर्ग 1 मध्ये बदलवण्याची प्रमाणपत्रे लाभार्थ्यांना प्रदान केली जात आहेत. पोंभुर्णा तालुका प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य असावा, यादृष्टीने काम करण्याची गरज आहे. पोंभूर्णा येथील सात शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार मिळवले, ही अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील स्टेडियमचे काम उत्कृष्टपणे केले गेले असून, पोंभूर्णा येथील स्टेडियममधील उणीवा दूर करण्यासाठी मी स्वतः लक्ष देईन, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, ‘पोंभुर्णा हा पूर्वी मागास तालुका मानला जायचा. आवश्यक सोयीसुविधांची मोठ्या प्रमाणावर कमतरता होती. या तालुक्यात सर्व सुविधांचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायतची इमारत, अगरबत्तीचा उद्योग, बंधारे, सिमेंट रस्ते तसेच शेतकऱ्यांच्या पाणंद रस्त्याचे काम पुढील तीन वर्षांत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात युरिया खताची टंचाई लक्षात घेता, मागील आठवड्यात 1700 मेट्रिक टन व आज 1600 मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आले आहे. या आठवड्यात 7000 मेट्रिक टन युरिया खत जिल्ह्यासाठी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासू नये, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.’
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ‘एक पेड, मां के नाम’ असे आवाहन केले आहे. त्यामुळे, प्रत्येक गावात आणि शेतांच्या बांधावर वृक्ष लागवडीचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुल येथील सभागृहाप्रमाणेच पोंभुर्णा सभागृहाचे नूतनीकरण करण्यात येईल, अशी घोषणा आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. येत्या सहा महिन्यांत अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील स्मशानभूमीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे, अंगणवाडींचा दर्जा सुधारून सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे, तसेच तालुक्यातील घरकुल योजनांचे कार्य निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे. आदी कामे पूर्ण करण्याचा ठोस संकल्प करावा, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
• संजय गांधी निराधार योजना शाखेच्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅटबॉटचे लोकार्पण :.
तहसील कार्यालय, पोंभुर्णा येथील संजय गांधी निराधार योजना शाखेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅटबॉटचे लोकार्पण करण्यात आले.
लाभार्थ्यांना कृषी यंत्रसामुग्रीचे वाटप:
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व सेवा पंधरवडा अंतर्गत महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना सन 2025-26 अंतर्गत श्रीमती वनिता घोंगडे, गिरीधर कुट्टूलवार, मंदा येरमे, जानकीबाई बोबाटे, रामकृष्ण गव्हारे, कोमल झाडे आदी लाभार्थ्यांना रोटावेटर, स्वयंचलित टूलबार आणि ट्रॅक्टरची चावी प्रदान करण्यात आली.
भोगवटदार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरण आदेशांचे वितरण:
पोंभुर्णा तालुक्यातील राजेश्वर तेलंग, दत्तू उराडे, रमेश व्याहाडकर, रामचंद्र भंडारे, जीवनदास खोब्रागडे, नरेंद्र बोधलकर, नामदेव सोमानकर, रेखा जाधव, धनराज उराडे, प्रतीक बोंडे आदी लाभार्थ्यांना भोगवटदार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरणाचे आदेश आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
श्रावणबाळ/संजय गांधी निराधार योजनांचा लाभ:
पुरुषोत्तम तेलसे यांना श्रावणबाळ योजनेचा, सखुबाई शिंदे यांना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा तसेच उज्वला गौरकार, सोनाली झाडे, राजेश्वर देऊरमल्ले आदी लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला.
वाटणीपत्र आदेशाचे वितरण:
रमेश वरगंटीवार, घनश्याम लोणारे, निर्मलाबाई चिंचोलकर, दादाजी अर्जुनकार, सुरेश फरकडे, ताराचंद नेवारे, हरिदास बुरांडे, दिलीप बुरांडे, प्यारेलाल वनकर आदी अर्जदारांना जमिनीचे/ शेतीचे वाटणीपत्र आदेश प्रदान करण्यात आले.
शिधापत्रिकेचे वितरण:
जानकीराम रामगीरकर, फुलाबाई खोब्रागडे, इंदुबाई डायले, कौशल्याबाई राऊत, शैलेश दुर्गे, रश्मीबाई वडस्कर, संगीता सुरजागडे, जयश्री राऊत, संजय रामटेके आदी लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका तसेच शिधापत्रिकेच्या दुय्यम प्रतीचे वितरण करण्यात आले.
तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरुवात तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपणाच्या माध्यमातून करण्यात आली.