अलिबाग मधील एकाची ऑनलाइन गेम द्वारे फसवणूक; एक आरोपी अटक
रायगडच्या सायबर गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मोबाईलवर ऑनलाईन गेमसह जुगार खेळण्याचा फॅड वाढला आहे. अलिबागमधील एका व्यक्तीची ऑनलाईन गेम खेळताना अशीच फसवणूक झाली. रायगड पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने आठ दिवसांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला. राजस्थानमधील एकाला अटक करण्यात आले असून, आणखी पाच जणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. करोडोची लुट या खेळातून झाल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड पोलिसांनी अलिबागमधील चेंढरे येथील अमित जाधव यांच्या मोबाईलवर ए.एम. 999, मधुर मटका, लकी स्पाईंस, तीन पत्ती अशा अनेक प्रकारच्या ऑनलाईन गेमिंग ॲपची जाहिरात गेल्या चार महिन्यापूर्वी येत होती. मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध असल्याने या जाहिराती त्यांना कायदेशीर वाटल्या. वारंवार होणाऱ्या जाहिरातीला प्रवृत्त होऊन त्यांनी जास्तीचे पैसे कमविण्याच्या हेतूने ए.एम. 999, मधुर मटका असे तीन अॅप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांनी ऑनलाईन गेम खेळण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी गुगल पे मार्फत 10 हजार रुपये ए.एम. 999 या अॅपच्या वॉलेटमध्ये जमा केले. परंतु, जाधव यांना कोणताही परतावा मिळाला नाही. त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी 19 सप्टेंबरला सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार केली.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव, सहाय्यक फौजदार अजय मोहिते, पोलीस हवालदार राजीव झिंजूर्टे, महिला पोलीस हवालदार सुचिता पाटील, पोलीस नाईक तुषार घरत, समीर पाटील, राहूल पाटील, ईश्वर लांबोटे, पोलीस शिपाई श्रेयस गुरव यांनी वेगवेगळ्या मार्गाने शोध घेण्यास सुरुवात केली. राजस्थानमधील उलियाना येथील भारमल हनुमान मिना याला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात आणखी पाच जणांचा समावेश आहे.ऑनलाईन गेमिंग अॅप व जुगाराच्या तपासात 44 म्युल बँक खात्यातील 19 कोटी 44 लाख, तीन हजार 493 रुपये गोठविले आहेत. आरोपीच्या घरातील नातेवाईकांच्या वेगवेगळ्या बँकेत करंट खाते आहे. त्यांचा उपयोग वेगवेगळ्या अॅपद्वारे फसवणूक करून कमिशन स्वरुपात प्रति दिवस एक लाख रुपयांची कमाई करण्यासाठी केला जात होता. आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध युध्द पातळीवर सुरु आहे. भारमल याने इतर साथीदारांच्या मदतीने ऑनलाईन गेमिंग व जुगारच्या सहाय्याने बऱ्याच लोकांची फसवणूक केली आहे.