डहाणू शहरातील लोणीपाडा येथे फुगा कारखान्यात आग
अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली
भरत पुंजारा
पालघर तालुका प्रतिनिधी
मो.९९२३८२४४०७
डहाणू नगरपरिषद हद्दीतील लोणीपाडा परिसरात रविवारी रात्री अचानक लागलेल्या आगीने खळबळ उडाली. सुमारे आठच्या सुमारास एका फुगा कारखान्यात लागलेल्या या भीषण आगीची माहिती मिळताच डहाणू नगरपरिषद अग्निशमन दल तसेच अदाणी अग्निशमन पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संयुक्तरीत्या आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. पथकांच्या वेगवान आणि समन्वयित कामगिरीमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
नगर अग्निशमन अधिकारी प्यारचंद आदिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता आहे. आग लागली त्यावेळी कारखान्यात कामगार नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, कारखान्यातील साहित्य जळाल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळे आग मोठ्या परिसरात पसरून गंभीर दुर्घटना घडण्यापासून वाचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.