सिद्धांत
मुंबई २४ डिसेंबर २०२१: जनरल बिपीन रावत यांचा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याच्या घटनेला काही दिवस झाले नाही तोच, २४ डिसेंबरला राजस्थानमध्ये लष्कराचे MiG-२१ विमान कोसळल्याची बातमी समोर आली. २४ डिसेंबरच्या रात्री ८:३० भारतीय हवाई दलाचे MiG-२१ विमान जैसलमेर येथील पाकिस्तान सीमारेषेजवळच्या सुदासिरी या गावात कोसळले. या दुर्देवी अपघातात पायलट हर्षित सिन्हा यांचा मृत्यू झाला. हवाई दलाने या अपघाताचे कारण शोधून काढण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत. देशभरातुन शाहिद पायलट हर्षित सिन्हा यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. पण त्याचबरोबर ते चालवत असलेल्या MiG-२१विमान बद्दल गंभीर विचार करणे गरजेचे झाले आहे. गेल्या ५ वर्षात ११, तर २०२१ चालू वर्षात 4 MiG-२१ विमान कोसळून अपघातग्रस्त झाली आहेत. हवाई दलाची MiG-२१ विमान मृत्यूचे सापळे बनत आहेत का?
२०२१ मध्ये ४ MiG-२१ विमानांचा अपघात
१७ मार्च २०२१ ला MiG-२१ विमान मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे कोसळले. या अपघातात ग्रुप कॅप्टन आशिष गुप्ता यांचा मृत्यू झाला.
२० मे ला पंजाब मधील मोगा येथे MiG-२१ विमान कोसळून पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला.
५ जानेवारीला तांत्रिक बिघाडामुळे MiG-२१ विमान राजस्थान येथे कोसळले. पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
MiG-२१ विमानाची निर्मिती आणि भारतीय हवाई दलात प्रवेश.
MiG-२१ विमानांची निर्मिती रशियन हवाई दलातर्फे १९६०च्या दशकात करण्यात आली होती. ७०च्या दशकात भारतीय सरकारने रशियाकडून या विमानांची खरेदी केली. पुढची बरीच वर्षे हि विमान भारतीय हवाई दलाचा आधार बनली होती. परंतु पुढे तंत्रज्ञानात प्रगती झाली,नवीन क्षमतेच्या विमानांचा वापर सुरु झाला. १९८० पासून खुद्द रशियाने हि विमान लष्करी कामासाठी वापराने बंद केलं. परंतु भारतामध्ये आजतागायत या विमानांचा वापर सुरु आहे.
२०१२ साली काँग्रेस प्रणित केंद्र सरकारच्या काळात संरक्षण मंत्री असलेले ए.के. अँटोनी यांनी संसदेत एक चिंताजनक आकडेवारी मांडली होती. रशियाकडून घेतलेल्या एकूण ८७२ MiG-२१ विमानांनपैकी ४८२ विमान १९७१ ते २०१२ या कालावधीत कोसळून अपघातग्रस्त झाली होती. या अपघातांमध्ये १७१ पायलट, ३९ नागरिक आणि ९ हवाई दलातील कर्मचारी मृत्युमुखी पडले होते.
MiG-२१ मधील तांत्रिक अडचणी
बीबीसी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार जगभरातल्या लष्करी पायलटच्या MiG-२१ च्या डिझाईन बद्दल अनेक तक्रारी होत्या. त्यामध्ये मुख्यतः कॉकपीटचे डिझाईन आणि आणि त्यामुळे लँडिंग करताना धावपट्टीचा अंदाज लावण्यात येणाऱ्या अडचणी यांचा समावेश होता. तसेच MiG-२१ विमान “सिंगल इंजिन एअरक्राफ्ट” असल्याने, उड्डाणदरम्यान इंजिन फेल झाल्यास विमान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळण्याची शक्यता जास्त असते.
संभाव्य धोका माहित असताना सुद्धा MiG-२१ विमानाचा वापर आजतागायत का सुरु आहे?
हवाई दलाकडे दुसरा कोणता पर्याय आहे का? आज हवाई दलाला १२६ राफेल विमानाची गरज असताना फक्त ३६ राफेल विमानाचा पुरवठा झाला आहे. भारतीय बनावटीच्या लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्टच्या उत्पादनाला यागोदरच खूप विलंब झाला आहे. त्यामुळे भारताच्या संरक्षणासाठी हवाई दलाला जुन्या MiG-२१ विमानांचा वापर करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरलेला नाही, असे परखड मत निवृत्त एअर व्हाईस मार्शल सुनील नानोडकर वृत्तसंस्थांशी बोलताना मांडले होते.
२०२२ मध्ये भारतीय हवाई दल MiG-२१ विमानांचा वापर पूर्णपणे थांबवणार असल्याचे सांगितले जात आहे.