रायगड जिल्ह्यात बेकायदा दारू विक्रेत्यांवर ‘वॉच’
थर्टी फर्स्ट निमित्ताने कायदा व सुव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी
रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत बेकायदा दारू विक्रेत्यांवरही निवडणूक आयोगाच्या आदेशाने निर्बंध घालण्यात आले होते. मागील आठ महिन्यात रायगड जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई करीत तब्बल १५३० जणांना अटक केली होती. हे सातत्य नववर्षाच्या स्वागता पर्यंत कायम राहणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली असून येणाऱ्या संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जाते.
एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२४या कालावधीत बेकायदा दारू विक्रेत्याकडून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ७५ वाहने कारवाई जप्त करण्यात आलेली होती. या धडक कारवाईतून रायगड जिल्ह्यात पाच कोटी ३६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तो मागील वर्षातील पूर्ण बारा महिन्याच्या सरासरी इतका आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नऊ वर्ष स्वागताच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांकडून सर्वाधिक दारूच्या बाटल्या रिचवल्या जातात. यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने या कालावधीत बेकायदा दारू विक्रीच्या विरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यास सुरुवात केली आहे. वर्ष संपण्यास अद्याप काही दिवस शिल्लक असताना रायगड जिल्ह्यात नाका तपासणी सुरू करण्यात आली आहे. यात बेकायदा दारू, अमली पदार्थ यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. रायगड जिल्ह्यात डिसेंबर मध्ये सर्वाधिक मद्यविक्रीची उलाढाल होत असते. त्या खालोखाल एप्रिल मे महिन्यातील लग्नसराईत दारू विक्री वाढत असते.
*हातभट्टी दारूची सर्वाधिक विक्री*
रायगड जिल्ह्यात गावठी दारूची निर्मिती करून विक्री केली जाते. आरोग्याला अत्यंत घातक असणाऱ्या असताना ब्रँडेड दारू परवडत नाही म्हणून अनेक जण हातभट्टीची दारू पीत असतात. दारूबंदी विभाग, उत्पादन शुल्क विभाग या विरोधात नेहमी कारवाईची मोहीम राबवत असतात. परंतु गावठी दारूच्या हातभट्टी बंद करण्यात यश आलेले नाही. या बेकायदा दारू विक्रीतून सरकारचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडवला जातो. त्याच बरोबर आरोग्याला घातक असलेल्या हातभट्टीच्या दारूमुळे अनेकांना जीव गमावा लागतो.यामुळे हातभट्टीच्या दारूवर निर्बंध आणावे त अशी मागणी महिलांकडून सातत्याने केली जात आहे.
@ मागील वर्षाच्या सरासरीपेक्षा यंदा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल जास्त आहे. कारवाईचे हे सत्र असेच कायम राहणार आहे. थर्टी फर्स्ट निमित्ताने दारू विक्री वाढते यावर निर्बंध आणण्यासाठी नाकाबंदी केली जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील हातभट्टी व्यवसायिकांवर कारवाईची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.
रविकिरण कोले अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग रायगड
*मागील २०महिन्यात झालेली कारवाई* कालावधी १ एप्रिल ते ३१ मार्च २०२४, गुन्हे २२१९ अटक २३१६ वाहने १२२ मुद्देमाल रुपये ५कोटी ७७लाख १२हजार ५३३
कालावधी १ एप्रिल ते ३१नोव्हेंबर २०२४ गुन्हे १६३९ अटक १५३१ वाहने ७५ मुद्देमाल रुपये ५ कोटी ३६ लाख ७५ हजार ५६०
एकूण गुन्हे ३८५८ अटक ३८४७ वाहने १९७ मुद्देमाल रुपये ११ कोटी १३लाख ८८ हजार ९३ रुपये