परभणी महापालिकेच्या आवारात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

56

परभणी महापालिकेच्या आवारात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न.

परभणी:- महापालिकेच्या आवारात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यावेळी परिसरात उपस्थित असलेल्या पोलिसांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेणाऱ्या युवकाला ताब्यात घेतलेय. शाहेद शमीम खान असं या व्यक्तीचं नाव आहे, शिवाय तो परभणी जिल्हा अल्पसंख्याक समितीचा सदस्य असून, भाजपचा कार्यकर्ता आहे. महापालिकेत एकूण किती कंत्राटी अभियंता आणि कर्मचारी आहेत, याची माहिती ते महिनाभरापासून महापालिकेला मागत होते. शिवाय अनेक विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. पण सदर माहिती ही दिली जात नसून त्या आरोपांची चौकशीसुद्धा केली जात नसल्याने शाहेद शमीम खान यांनी प्रजासत्ताकदिनी आत्महत्या करू, असं निवेदन देऊन महापालिकेला इशारा दिला होता. पण याकडे मनपाने कानाडोळा केल्याने तक्रारकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. कंत्राटी अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी कोट्यवधींची कामे केली आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खान यांनी केलाय. ज्यामध्ये दीडशे कोटींच्या पाणीपुरवठा योजना आहेत. शाही मशिदीपर्यंत बनवण्यात आलेल्या रोडचा समावेश आहे, नाना-नानी उद्यान आणि इतर काही कामांना महापालिकेने कार्यारंभ आदेश दिलाय. त्याची महापालिका आयुक्तांनी पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी या खान यांनी केली होती, यापैकी काहीच न झाल्याने त्यांनी हे पाऊल उचललं. अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याबरोबर पोलिसांनी खान यांना ताब्यात घेतलं. या घटनेने प्रजासत्ताक दिनी एकच खळबळ माजलीये.