शिवरायांबद्दल अपशब्द: छिंदमचं नगरसेवक पद रद्द

54

अहमदनगर:महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा बडतर्फ उपमहापौर श्रीपद छिंदम याला आज आणखी एक दणका देण्यात आला. छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव अहमदनगर महापालिकेत एकमतानं मंजूर करण्यात आला. इतकंच नव्हे, छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला.
कार्यालयीन कामाच्या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्याला दमदाटी करताना छिंदम यानं शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. भाजपनं छिंदमची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र, त्याचं नगरसेवकपद रद्द करावं, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली होती. त्यासाठी आज महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त करत छिंदमचं नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रस्तावाला हात उंचावून पाठिंबा दिला. भाजप गटनेते दत्ता कावरे यांनी मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी अनुमोदन दिलं. यावेळी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचा ठरावही महापौरांकडून मंजूर करण्यात आला. या महासभेला शिवसेनेचे नगरसेवक काळे कपडे तर नगरसेविका काळ्या साड्या परिधान करून सभागृहात दाखल झाल्या होत्या. शिवसेनेच्या नगरसेवकांनी जयघोष करत शिवाजी महाराजांचा पुतळा सभागृहात आणला.
महासभेचं कामकाज सुरू होताच काही सदस्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्यामुळे महासभेत आरोप-प्रत्यारोप झाले. संघाने कधीही शिवजयंती साजरी केली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. या आरोपानंतर भाजप सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळं काही काळ गोंधळ झाला. जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. तर, काँग्रेसनं उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उपमहापौरपदाचा उमेदवार न देण्याची मागणी केली. यानंतर एकमतानं ठराव मंजूर करून महासभेचं कामकाज संपलं.