स्पॉटलाईट: ड्रॅगनच्या कुरापती सुरूच…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

अरूणाचल प्रदेश आणि लडाख या भागांवर चीनचा डोळा आहे हे लपून राहिले नाही काही झाले तरी हा भाग आपल्या घशात घालायचा असा चीनचा डाव आहे त्यासाठी तो १९६२ पासून प्रयत्न करत आहे. १९६२ साली भारताची सामरिक शक्ती कमी होती त्यामुळे चीनला त्यात काही प्रमाणात यश मिळाले अर्थात त्यावेळीही चीनने विश्वासघात करूनच हे मनसुबे साध्य केले.

हिंदी चिनी भाई भाई म्हणत १९५५ साली भारताशी मैत्रिचे नाटक केले. १९६२ साली भारताशी पंचशील करार केला आणि या कराराची शाई वाळण्याच्या आतच भारतात घुसखोरी केली आणि ३८ हजार किलोमीटरचा प्रदेश बळकावला. भारताचा मोठा भूभाग बळकावूनही चीनचे पोट भरले नाही म्हणूनच त्याने अरुणाचल प्रदेशातील ८० हजार चौरस फूट भूभागावर दावा केला आणि तो मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या सर्व तत्वांचा अवलंब केला मात्र १९६२ साली झालेल्या चुकीची पुनरावृत्ती भारताने केली नाही म्हणूनच चीनला त्याचे मनसुबे पूर्ण करता आले नाही. तरीही अधूनमधून भारताच्या कुरापती काढून भारताला त्रास देण्याचे काम चीन करतोच.

दोन वर्षांपूर्वी चीनच्या सैनिकांनी दादागिरी करून भारतीय हद्दीत प्रवेश केला मात्र भारतीय सैनिकांनी चीनला जशास तसे उत्तर दिल्याने चीनचे हे मनसुबे यशस्वी झाले नाहीत त्यानंतर मात्र चीनने भारताशी चर्चेचे नाटक केले अर्थात भारत चीनचे हे नाटक चांगलेच जाणून आहे म्हणूनच भारतानेही चीन सीमेवरील गस्त वाढवून चीनला इशारा दिला मात्र शांत बसेल तो चीन कसला? भारताच्या कुरापती काढून भारताला सीमावाद धगधगत ठेवतच असतो आताही चीनने अशीच एक नवीन कुरापत काढली आहे.

भारताच्या सीमेला लागून असलेल्या एलएसीजवळील तिबेट प्रदेशात रेल्वे मार्ग टाकण्याच्या योजनेवर चीन काम करत आहेत. तिबेटच्या विकास आणि सुधारणा आयोगाने चीनच्या या योजनेचा पर्दाफाश केला आहे. सध्याच्या १४०० किमी वरुन २०२५ पर्यंत चार हजार किमी आणि २०३५ पर्यंत पाच हजार किमी पर्यंत रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या भारत आणि नेपाळ सीमेजवळून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. एकीकडे सीमावर्ती भागांचे एकत्रीकरण करून सीमा सुरक्षा वाढवायची तसेच गरज पडल्यास सीमेवर वेगाने सैन्य जमा करण्याची क्षमता विकसित करणे हे चीनचे या योजनेमागचे महत्वाचे कारण आहे उद्या जर भारताशी युद्ध झालेच तर रेल्वे मार्गाने सैन्याची आणि युद्ध सामग्रीची जलद वाहतूक करता यावी यासाठी चीनने हा रेल्वे मार्ग वाढवण्याची योजना आखल्याचे स्पष्ट आहे. भारतासाठी ही धोक्याची घंटा असली तरी भारत मात्र चीनचे हे मनसुबे जाणून आहे त्यामुळेच भारत देखील दक्ष आहे.

चीनच्या प्रत्येक कृतीवर भारताची नजर आहे . उद्या जर चीनने काही आगळीक केलीच तर त्या आगळीकीला भारत चोख प्रत्युत्तर देण्यास भारत तयार आहे कारण आजचा भारत हा १९६२ चा भारत नाही तर २०२३ चा भारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here