रिलायन्स नागोठणे संलग्न नवीन प्रकल्पाविरोधात बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचा एल्गार

रिलायन्स नागोठणे संलग्न नवीन प्रकल्पाविरोधात बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीचा एल्गार

१ एप्रिल पासून उपसणार पुन्हा आमरण उपोषणाचे हत्यार

मंजुळा म्हात्रे
नागोठणे शहर प्रतिनिधी
मो. ९२८४३९३४४८

नागोठणे :- रिलायन्स नागोठणे कंपनी संलग्न बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्प उभारला जात आहे. अशातच येथील स्थानिक , भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त , सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकरी यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून अद्याप पर्यंत लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची विश्वासार्ह हमी आजवर दिली नसल्याचा असंतोष स्थानिक नागरिकांत खदखदत आहे. येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्यासाठी तसेच शेतजमिनी कडे जाणारे मार्ग कायम ठेवण्यासाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आपल्या न्याय हक्कासाठी येथील शेतकरी, पशुपालक, मच्छिमार दि. १ एप्रिल २०२५ रोजी बेणसे सिध्दार्थनगर पाण्याच्या टाकीलगत आमरण उपोषणास बसणार आहेत.
रिलायन्स व्यवस्थापन केवळ बैठका घेऊन आश्वासने देत आहे, यातून प्रकल्प बाधित घटकांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही तक्रार व मागणीवर रिलायन्स व्यवस्थापन न्यायिक भूमिका घेत नसल्याचे बेणसे झोतीरपाडा प्रकल्प बाधित स्थानिक संघर्ष समितीने तक्रारी निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उबाठा )पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर, खासदार वर्षा गायकवाड, खासदार चंद्रशेखर रावण आझाद, आर पी आय १९५६ राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार, रायगड जिल्हाधिकारी, रायगड पोलीस अधीक्षक , महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ , उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बेलापूर, आदींना देण्यात आले असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे व अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीत येऊ घातलेल्या नवीन प्रकल्पसंदर्भात संघर्ष समिती व रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन व प्रशासन यांच्यात उमंग, इस्टेट ऑफिस, व प्रांताधिकारी कार्यालय पेण येथे स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी व नागरिक यांच्या विविध प्रश्न व समस्यांबाबत वारंवार बैठका होऊन आश्वासने देऊन सकारात्मक चर्चा होऊन देखील आजता गायत एकही विषय मार्गी लावला नाही. तक्रारी अर्जाद्वारे मंत्रालय स्थरावर, रायगड जिल्हा व तालुका प्रशासनाकडे दिलेल्या मागण्यात प्रामुख्याने नमूद या मागण्या १)ई. डी. पी.एल लाईन एक वर्षांपासून लिकेज झाल्याने शेतकऱ्यांचे , मच्छिमार व पशुपालक यांच्या व्यवसायावर केमिकल युक्त दूषित पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे व आजही होत आहे. या नुकसान ग्रस्त घटकांची आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले होते, मात्र आजपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. ती नुकसान भरपाई त्वरित मिळावी. २)नवीन प्रकल्पाच्या मातीच्या भरावा मुळे सर्व व्यवसायिक व शेतकरी यांचे कायमस्वरूपी नुकसान होणार असल्या
मुळे या घटकाला उदर निर्वाहाच्या दृष्टीने शिक्षण व गुणवत्तेनुसार कायमस्वरूपी नोकरी देण्याचे मान्य केले होते , तसेच बी एस सी , डिग्री ,डिप्लोमा व आय टी आय व फायर मॅन यांना सध्या चालू असलेल्या रिलायन्स कंपनीत कामाला कायम स्वरूपी सामावून घेण्याचे मान्य केले होते, त्या सर्व मुलांची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते, यावर
आजपर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही. ३)शेतकऱ्यांची पूर्वापार चालू असलेली वहिवाट मोकळी सोडून जाण्या येण्याचा रस्ता देण्याचे मान्य केले होते, परंतु सर्वत्र जागोजागी अवाढव्य खोदकाम करून जुना रस्ता सुद्धा बंद करून ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.
४)सदर कंपनीने लाखो ब्रास माती भराव व दगड टाकून ठेवल्याने दोन महिन्यात पाऊस पडून शेतीत माती दगड जाऊन नुकसान होणार आहे. या मध्ये शेतकऱ्यांचे पशुधन नष्ट होणार आहे, त्यावर उपाययोजना म्हणून आर बांध बंधारा बांधण्याचे कंपनीने मान्य केले होते, त्यावर ही कोणतीच कार्यवाही झाली नाही.
५)नव्याने उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचा सर्वाधिक त्रास बेणसे बौध्द वाडीला होणार आहे.त्याच प्रमाने २५/२/२०२५ रोजी पुर्ण बौध्द वाडीस आगीने विलखा घातला असता फायर बंब सुध्दा येण्यास रस्ता नव्हता ह्याचे सुध्दा अपत्ती व्यवस्थापण नव्हते जर कंपनी व्यवस्थापनाचा ३५ फुट संरक्षण भिंत बांधण्याचा घाट आहे त्यामुळे काय होवु शकते ह्याची कल्पना सुध्दा करु शकत नाही, त्यामुळे बौद्धवाडी समोर कोणतीही संरक्षण भिंत घालू नये अशी आमची ठाम मागणी आहे आता
सदरचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सिध्दार्थ नगर बौध्द वाडी समोर गेट ठेऊन संघर्ष समितीला मेस व खानावळ टाकण्याचे पूर्वीच्या मीटिंगमध्ये मान्य केले होते त्याची पूर्तता करावी. ६)बैठकीत दिलेली आश्वासने, प्रलंबित मागण्या व समस्या यांची सोडवणूक न करता पोलीस बळाचा वापर करून स्थानिक शेतकरी, मच्छिमार, पशुपालक अन्नदाते यांना धम्मकावू नये . ७)मातीच्या भरावाने बेणसे झोतीरपाडा व अन्य नागोठणे विभागात महापूर परिस्थिती अधिक उदभवण्याची भीती आहे, आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासन यांनी उपाययोजना करावी. ८)जोपर्यंत स्थानिक जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवावे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील. वरील मागण्यांच्या अनुषंगाने दिनांक १/४/२०२५ रोजी दुपारी २.०० वाजता शेतकरी व स्थानिक असे चारजण बेणसे सिध्दार्थ नगर (आंब्याचे झाड) येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत, याची आपण गांभीर्याने
दखल घ्यावी, उपोषणा दरम्यान आमच्या जीविताला काही हानी अथवा धोका निर्माण झाल्यास रिलायन्स नागोठणे व्यवस्थापन व शासन प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. असा इशारा या तक्रारी निवेदनाद्वारे दिला आहे.