बदलत्या हवामानाचा सर्वच क्षेत्रांना फटका

57

बदलत्या हवामानाचा सर्वच क्षेत्रांना फटका

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

 मो: ९९२२५४६२९५

बदलत्या हवामानाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसत आहे. त्यातही कृषी क्षेत्रावर त्याचा जास्तच परिणाम होताना दिसत आहे. सध्या एप्रिल महिना चालू आहे. सर्वत्र कडाक्याचे ऊन जाणवत आहे. सर्वच शहरांचे तापमान ४० अंशाच्या घरात आहे. विदर्भातील काही भागात तर तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. तापमान वाढल्याने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना अनेक आजार होत आहेत. या कडाक्याच्या उन्हात लोकांना चक्कर येणे, हृदय विकाराचा झटका येणे, रक्तदाब वाढणे, शरीरातील पाणी कमी होणे, डोळ्यांचे विकार जडणे, लहान मुलांचा घोळणा फुटणे, उष्माघात होणे असे प्रकार घडतात. उष्माघाताने काहींचा जीवही जाऊ शकतो.

खारघर मधील घटना ताजीच आहे. उष्माघातामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १५ श्री सेवेकरांना जीव गमवावा लागला आहे. कडाक्याच्या उन्हात जास्तीतजास्त पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. तसेच फळांचा ज्यूस सेवन करण्यास सांगितले जाते. डॉक्टरांकडून दुपारी ११ ते ४ घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो मात्र पोटापाण्यासाठी लोकांना घराबाहेर पडावेच लागते. एकीकडे कडाक्याचे ऊन असताना राज्यातील काही भागात मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

पुढील चार दिवसात राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. फळबागा जमीनदोस्त होतात. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. क्षणात होत्याचे नव्हते होते. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी पडते. अवकाळी पाऊस झाला की बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकतो. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडणे ही गेल्या काही वर्षातील नित्याची बाब झाली आहे. कडाक्याचे ऊन, अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ अशा घटना वर्षभर घडत असतात. महाराष्ट्र हे सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे.

पूर्वी सर्व ऋतूंचे आगमन वेळेवर होत होते. मागील काही वर्षात ऋतुमानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. ऋतुमानच बदलले आहे. पूर्वी पाऊस फक्त पावसाळ्यातच पडत असे आता वर्षभर कोठेना कोठे पाऊस पडताना दिसतो. पावसाळ्यात दोन दोन महिने पाऊस पडत नाही. कधीकधी दोन दिवस इतका पाऊस पडतो की दोन दिवसात दोन महिन्याची सरासरी भरून काढतो. त्यामुळे कोणत्या ऋतूत कोणते पीक घ्यावे याबाबत शेतकरी संभ्रमात असतो. बदलत्या हवामानामुळे काहींनी शेती करणेच बंद केले आहे. राज्यात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात जंगलतोड वाढली आहे. काँक्रीटीकरण वाढले आहे. शहरे सिमेंटचे जंगले बनली आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झाला आहे. त्यामुळे वातावरणात बदल होत आहे. वातावरणातील बदलामुळे या घटना घडत आहेत.

निसर्गाच्या या बदलत्या चक्राचा मानवजातीवरच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीवरच परिणाम होत आहे. लोकांनी यातून धडा घेऊन आतापासूनच निसर्ग नियमाने जगणे सुरू करायला हवे. वृक्षतोड थांबवली पाहिजे, जंगलतोड थांबवली पाहिजे. वृक्षलागवड करून ती जगवली पाहिजेत. माणसाने निसर्गावर केलेले आक्रमण थांबवले पाहिजे. जर माणसे निसर्ग नियमाच्या विरुद्ध गेले तर त्याची मोठी किंमत येणाऱ्या पिढीला मोजावी लागेल.