जोगेश्वरीत सृजनांचा छंदवर्ग संपन्न
पूनम पाटगावे
जोगेश्वरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संचालित बालविकास विद्यामंदिर, जोगेश्वरी शाळेत “विविधा २०२३” या छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव मिळावा व सुट्टीच्या कालावधीत मोबाईलमधील विविध प्रसारमाध्यमांच्या जाळ्यात न अडकता हे विविध छंद जोपासून विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करावा हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. या छंदवर्गात गायन, ओरिगामी , अक्षरलेखन, हस्तकला, वैज्ञानिक खेळणी, नृत्य ,अभिनय ,मेहंदी
इ. विविध कलांचे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सांगता समारोपात संस्थेच्या चिटणीस सौ. सुरक्षा घोसाळकर यांनी मुलांना ‘ सृजनशीलतेची कास व प्रगतीचा ध्यास ‘ असा संदेश देत आताचे युग हे नवनिर्मितीचे , संशोधनाचे असून विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला पोषक वातावरण निर्माण करण्याची महत्त्वाची कामगिरी शाळेतील सर्व शिक्षकवृंदाने उत्तमरीत्या पार पाडल्याबद्दल कौतुकही केले.
सृजनशील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षिसेही देण्यात आली. मुख्याध्यापक सिध्दार्थ इंगळे यांच्या प्रेरणेतून उपक्रमप्रमुख कलाशिक्षिका अनघा घुगरे यांनी उत्तम नियोजन केले. सर्व शिक्षकांच्या उत्कृष्ट सहकार्यामुळेच आनंदी,उत्साही वातावरणात विविध कलांचे सादरीकरण करताना विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर नवीन काहीतरी शिकल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. अशाप्रकारे या छंदवर्गाचा सांगता समारंभ जल्लोषात पार पडला.