समाजमान्य बलात्कार…

57

समाजमान्य बलात्कार…

समाजमान्य बलात्कार...

माझ्या पायात घातलेल्या
व मला आवडणाऱ्या,
नाजूक आणि सुंदर चैनपट्टीचा
मनमोहक छमछम आवाज…

एक दिवस प्रतिष्ठा, परंपरा
आणि समाजाच्या नावावर,
माझा प्रत्येक हुंदका दाबत राहिल,
याची कल्पनाही केली नव्हती कधी…

माझ्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता,
तुफानाचा सामना करणारा बाप,
जात नावाच्या मानसिकतेला घाबरून,
मला प्रेमाचा बळी देण्यास भाग पाडेल
असा विचारही केला नव्हता मी …

जन्मभर काबाडकष्ट करून
सोन्याचा घास खाऊ घालणाऱ्या बापानं,
विषाचा घोट घेऊ नये या काळजीने
निमुटपणे अश्रू पिण्यास भाग पाडलं मला …

माझ्या काळजाचा घाव
माझ्या आई मधल्या बाईला
दिसत असावा कदाचित …
पण कधी मुलगी, कधी पत्नी म्हणून
तीनेही केलाच आहे खून
मनातील कितीतरी निष्पाप भावनांचा …

नेहमी मानवतेचे धडे गिरवणारे आम्ही,
कायम माणुस म्हणूनच चुकतो
आणि प्रेमाला जात नसली तरी,
प्रेमात जात येतेच शेवटी …

बाबा तुम्ही मारलेली घट्ट मिठी
जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण वाटत होतं नेहमी …

बलात्काराच्या घटनेची बातमी वाचून
मला काळजीने जवळ घेऊन
किती घाबरलेले दिसायचे तुम्ही…

आपल्या मुलीच्या नशिबात
कधी बलात्कार असू नये,
असंच वाटलं तुम्हाला नेहमी प्रत्येक बापाप्रमाणे …

पण प्रतिष्ठा, परंपरा आणि जातीमुळे
आता माझ्यावर रोज बलात्कार होतोय …
होय बाबा, समाजमान्य बलात्कार …!

कवी- निलेश पवार, भुसावळ
८३०८५५८७१०