पूरपीडितांसाठी यंग चांदा ब्रिगेडने केली ही महत्त्वाची मागणी…

49

नुकसान भरपाईची आर्थिक मदत शासनातर्फे सरळ पूरपीडितांच्या बँक खात्यात तत्काळ जमा करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी, तहसीलदार यांना निवेदन

 अश्विन गोडबोले

 चंद्रपूर ब्युरो चीफ

📱 8830857351

चंद्रपूर, 25 जुलै: चंद्रपूरात पावसाच्या पाण्याने नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. या नुकसाणीची भरपाई देत आर्थिक मदत करत असतांना शासनाने नुकसान भरपाईची आर्थिक मदत धनादेशाच्या माध्यमातून न देता डीबिटीच्या माध्यमातून सरळ लाभार्थाच्या खात्यात तात्काळ जमा करावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून या मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने तहसीलदार विजय पवार यांना करण्यात आले आहे.

 

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व लगतच्या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्याने अनेक सखोल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानावर विपरीत परिणाम पडला आहे.

शासनाच्या निर्देशानुसार पूरसदृश्य बाधित घरांचे सर्व्हेक्षण करून त्यांना आर्थिक मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र मागच्या वर्षी ही मदत धनादेशाच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यामुळे पूरसदृश्य बाधितांना बँक धनादेश बचत खात्यावर वटविण्यास अडचणी आल्या होत्या. त्यांना वारंवार बँकेत जावे लागत होते. शासनामार्फत देण्यात येणारे कुठलेही अनुदान, भरपाई हे बाधितांच्या बँक खात्यावर डीबिटी च्या माध्यमातून देण्यात येत असते. यामुळे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरळ रक्कम जाते. त्यामुळे आर्थिक व्यवहार पारदर्शक होऊन लाभार्थ्यांना थेट लाभ होतो.

ही बाब लक्षात घेता येथील पूरसदृश्य परिस्थिती बाधितांना शासनातर्फे देण्यात येणारी आर्थिक नुकसानभरपाई डीबिटी च्या माध्यमातून सरळ त्यांच्या बँक खात्यात जमा करावी, तसेच उर्वरित पूरसदृश्य परिस्थिती बाधितांच्या घराचे सर्व्हेक्षण तातडीने करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. या मागणीचे निवेदन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार विजय पवार यांना देण्यात आले.

यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, अल्पसंख्याक आघाडीचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, युवा नेते अमोल शेंडे, शहर संघटक विश्वजीत शाहा आदींची उपस्थिती होती.