कुमशेत ग्रामपंचायतचे सांडपाण्याचे व घनकचऱ्याबाबत नियोजन शून्य
आदित्य गोरेगांवकर
गोरेगाव प्रतिनिधी
कुमशेत ग्रामपंचायतचे कार्यालय मु.तारणे ता.माणगाव जि.रायगड या गावच्या हद्दीत आहे.गोरेगाव मोर्बा हम रस्त्यावर तारणे गाव आहे.गावच्या प्रवेशद्वाराजवळ घनकचरा अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो तसेच तिथे कुठल्याही प्रकारची कचराकुंडी नाही.सदर रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचतं कारण तिथे कुठल्याही प्रकारची गटाराची व्यवस्था नाही गटार नसल्यामुळे तिथे पाणी साचलं जातं आणि त्या पाण्यामध्ये रस्त्यालगत टाकलेला घनकचरा वाहून येतो व त्या रस्त्याला तलावाचं स्वरूप प्राप्त होतो.
रस्त्यालगत कालवा आहे, कालव्याच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण होत आहे.त्या संदर्भात स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते वसीम सनगे यांनी वर्षभरापूर्वी ग्रामपंचायती जवळ पत्रव्यवहार ही केला होता.काही महिन्यांपूर्वी नवनिर्वांचीत सरपंच सचिन कदम यांना सदर बाब निदर्शनास आणून देखील त्यांनी ह्या गोष्टी कडे काणा डोळा केला.तसेच वर्षभरापूर्वी सनगे यांनी स्व- खर्चाने जेसीबी लावून सदर ठिकाणी गटार काढून घेतला होता.अतिक्रमणामुळे सदर गटार पुन्हा बुजल्यामुळे पाणी रस्त्यावर साचून राहते व शालेय विद्यार्थी, आबालवृद्ध,गरोदर महिला तसेच वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि त्या ठिकाणी बस थांबा असल्यामुळे त्या पाण्यामध्येच विद्यार्थी, प्रवासी यांना उभं राहावं लागतं.
अशा परिस्थितीत ग्रामपंचायत याची दखल घेईल का?असा प्रश्न ग्रामस्थ ग्रामपंचायतीला विचारत आहेत.