प्लास्टिकचा वापर टाळण्याकडे लोकांचा कल; वेगवेगळ्या रंगांची कलाकुसर नागरिकांची पसंती
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- सरकारने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाचा दर्जा लक्षात घेता, यावर्षीसुद्धा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाईल. उत्सवासाठी भाविकांची जय्यत तयारी करीत आहेत. घरगुती गणेशपूजनासाठी मखरांची खरेदी सुरू आहे. पर्यावरणपूरक मखरांना सर्वाधिक मागणी आहे.
कापड,कागदापासून विविध आकारांचे तयार केलेले मखर, वेगवेगळ्या रंगांची कलाकुसर नागरिकांना अधिक पसंत आहे. कृत्रिम फूल यांसारख्या वस्तूंचा वापर करत पर्यावरणस्नेही मखर तयार करण्यात आलेले आहेत. यात सर्वाधिक आकर्षक ठरत आहेत ते म्हणजे कापडी मखर. कारण या मखरामध्ये पाण्याच्या पाइपचा वापर करून त्यावर कपडा लावण्यात आला आहे. तसेच, त्यामध्ये एक लाइट सोडण्यात आली आहे. हे मखर आकर्षक दिसत असून, यंदा या मखराला सर्वाधिक मागणी आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्याकडे लोकांचा कल आहे. शाडू मातीच्या मूर्तीसाठी आग्रह धरत इको-फ्रेण्डली मखरांचीसुद्धा भाविक मागणी करत आहेत. आकर्षक अशा तीन फूट उंचीच्या मखरांची किंमत 2 हजार, 500 ते तीन हजारांपासून सुरू होते. आकार आणि रंगसंगतीच्या अनुषंगाने विविध मखरे ग्राहक खरेदी करीत आहेत.
पनवेल परिसरातील बाजारपेठेत असलेल्या दुकानांमध्ये कृत्रिम फुलांची सुंदर आरास बघायला मिळते. सुटी कृत्रिम फुले, या फुलांचे हार, माळांपासून बनविलेले मखर पाहायला मिळतात. सध्या या कृत्रिम फुलांना सर्वाधिक मागणी आहे. कृत्रिम फुलांपासून मखरे निर्मिती करण्याकडेसुद्धा कल आहे. फुलांच्या माळाही उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती 250 रुपयांपासून आहेत. अर्धगोल आकारातील फुलांचे मखर दोन हजारांपासून मिळत आहेत.पर्यावरणपूरक मखरांची खरेदी करताना दुसन्या बाजूला आकर्षक देखाव्यांमध्ये मंदिरांच्या आरासांनासुद्धा ग्राहकांची पसंती वाढत आहे. सिद्धिविनायक मंदिरापासून अगदी तिरुपती बालाजी मंदिरापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे बाजारामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. अष्टविनायक मंदिरांची प्रतिकृती दाखवणाऱ्या आरसाची किंमत 15 हजार रुपये असून, मोठ्या बालाजी मंदिराच्या आरसाची किंमत 16 हजार इतकी आहे. भवानी मंदिराची प्रतिकृती दर्शवणार्या मखराची किंमत 15 हजार असून लहान आकारांच्या मूर्तीसाठी असलेल्या मंदिरांच्या देखाव्यांची किंमत तीन हजार रुपयांपासून सुरू आहे.
इको फ्रेंडली मखर बनवण्यासाठी कापडाचा व कागदांचा व कृत्रिम फुले,पाने यांचा वापर करून घरगुती मखर बनवण्यात एक वेगळाच आनंद असतो.
कु.प्रथा पाटील
अलिबाग