ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल

ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल

शेकडो बस च्या फेऱ्या रद्द केल्याने प्रवासी त्रस्त

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- रायगड जिल्ह्यातील आठ एसटी आगारांतील 480 बसपैकी 172 बसेस मुंबई ठाणे येथील गणेशभक्‍तांना आणण्‍यासाठी पाठवण्‍यात आल्‍या आहेत. त्यामुळे रायगड जिल्‍हयाच्‍या ग्रामीण भागातील शंभरहून अधिक बसच्या फेऱ्या रद्द करण्‍यात आल्‍या . यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः ग्रामीण प्रवाशांना याचा फटका बसतो आहे. एसटीच्‍या फेरया कमी केल्याने बसची तासनतास वाट पाहण्‍याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

दुर्गम गावांतील या बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, डोंगराळ आणि अवघड रस्ते असलेल्या या गावांतील प्रवाशांसाठी आजही एसटी बसशिवाय पर्याय नाही. पोलादपूर, माणगाव, रोहा, म्‍हसळा या तालुक्यांमधील प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. सध्‍या गणेशोत्‍सव तोंडावर आल्‍याने ग्रामीण भागातील भाविक विविध वस्‍तू पूजा साहित्‍य यांच्‍या खरेदीसाठी शहरात येत आहेत. आज सकाळी येथील ग्रामस्थ खरेदीसाठी निघाले खरे; मात्र खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही एसटी बस आलीच नाही. कोकणवासीयांच्या प्रवासासाठी एसटी बस उपलब्ध केल्याने फेऱ्या बंद केल्याचे लक्षात आले.

पनवेल-अलिबाग हा मार्ग सर्वात जास्त रहदारीचा आहे. या मार्गावर अलिबाग बस आगाराच्या विनावाहक एसटी बस चालवल्या जातात. या आगारातील 30 बसेस मुंबईकर गणेशभक्‍तंच्‍या सेवेसाठी पाठवण्यात आल्याने या मार्गावरील 40 टक्के फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे सायंकाळच्या दरम्यान पनवेल बसस्थानकात अलिबागकडे येणाऱ्यांची प्रचंड गर्दी होते. याचा विचार करून या मार्गावरील फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

वरिष्ठ पातळीवरील आदेशाचे पालन करताना विद्यार्थी, नियमित प्रवाशांचा विचार करून फेऱ्या रद्द करतो. रविवारी सुट्टी असल्याने काही फेऱ्या तात्पुरत्या रद्द करण्यात आलेल्या होत्या. ज्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्यांचे माहिती फलक बस आगारात लावण्याचे आदेश संबंधित आगारप्रमुखांना देण्यात आले आहेत, असे विभागीय नियंत्रक दीपक घोडे यांनी सांगितले.

सध्‍या सणासुदीचे दिवस आहेत. त्‍यामुळे ग्रामीण भागातील नागरीक खरेदीसाठी शहरात येत असतात. महिलांना एसटीच्‍या तिकीटात 50 टक्‍के सवलत असल्‍यामुळे खरेदीसाठी येणारयांमध्‍ये महिलांची संख्‍या अधिक आहे. खाजगी रिक्षा किंवा मिनीडोअरने प्रवास करण्‍यापेक्षा महिला एसटीला अधिक पसंती देतात. बस मुंबईकरांसाठी पाठवण्याबद्दल काहीही हरकत नाही; पण त्यामुळे कोणत्या फेऱ्या रद्द होणार याची कल्पना प्रवाशांना देणे गरजेचे होते आयत्‍यावेळी फेरया रदद झाल्‍यामुळे आम्‍ही अडकून पडलो असे काही प्रवाशांनी सांगितले.