विसर्जन सोहळा लेझरविना; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश जाहीर
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईटच्या वापरावर रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बंदी आदेश जारी केला आहे.
दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या पाच दिवसांच्या तसेच दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अनंत चतुर्दशी विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे लेझर लाईट वापरण्यास सक्त मनाई असेल.
लेझर बीम, डॉल्बी साऊंड, स्नो व हिट स्प्रे यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात, अशा तक्रारी प्रशासनाला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या साधनांमुळे बहिरेपणा, हृदयविकाराचा झटका व डोळ्यांचे आजार उद्भवण्याचा धोका असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखणे या उद्देशाने हा आदेश देण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत दंडात्मक कारवाई होणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.