वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद अन् अभिमानास्पद: पालकमंत्री कु.आदिती तटकरे
श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन संपन्न

श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन संपन्न
✍मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अलिबाग,जि.रायगड :- जनतेच्या समस्या लक्षात घेऊन त्याचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून मी पालकमंत्री या नात्याने सदैव तत्पर आहे. करोनाच्या संपूर्ण कालावधीमध्ये श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने यश आले. करोना कालावधीमध्ये सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आणि अभिमानास्पदच आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
उपजिल्हा रूग्णालय श्रीवर्धन येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते बायो मेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट, जनरेटर, ड्युरा सिलेंडरचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रांताधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर ढवळे, स्काय इलेक्ट्रिकल चे सुधीर म्हात्रे, नगराध्यक्ष फैसल हुर्झुक, दर्शन विचारे, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, विविध पदाधिकारी आणि श्रीवर्धन मधील नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, येथील सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून सदैव प्रयत्नशील आहोतच. यासाठीच येथील प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार स्वरूपाची वैद्यकीय सेवा मिळण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे विविध आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. करोना कालावधीमध्ये उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अतिशय उच्च दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. करोनाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या स्वरूपात आरटीपीसीआर आणि अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. सध्यातरी आपण करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी झालो आहोत. तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी वर्गाने अतिशय चांगले काम केले असून शासकीय यंत्रणेसोबत विविध सेवाभावी संस्थांनी, विविध घटकांनी करोनाला पराभूत करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे योगदान दिले आहे.
सुधीर म्हात्रे स्काय इलेक्ट्रिकल्स यांनी ड्युरा सिलेंडर उपलब्ध करून दिले त्याबद्दल पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्या पुढे म्हणाल्या की, म्हसळा येथे 8 व श्रीवर्धन येथे 7 ड्युरा सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वीजपुरवठा खंडित होवून समस्या निर्माण होऊ नये, वीजपुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी जनरेटर सुद्धा आपण उपलब्ध करून दिले आहे. जनतेला वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत असून येत्या काळात लवकरच येथील रुग्णालय इमारतीच्या डागडुजीलादेखील सुरुवात करण्यात येईल.
यानंतर पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते कोलमांडला येथील केळीची वाडी येथील रस्त्याचे त्याचप्रमाणे बागमांडला येथील राममंदिरासमोर सभामंडपाच्या कामाचे,
बागमांडला ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण इमारतीचे, बंदर रोड येथे स्ट्रिट लाईट कामाचे आणि बागमांडला-दांडा येथील मुख्य रस्ता ते वावेलवाडी गावापर्यंत रस्त्याचे भूमीपूजन संपन्न झाले.