आर्थिक ताणामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न
•पत्नीचा मृत्यू, पती व दोन मुले गंभीर
•देलनवाडी परिसरातील घटना
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
ब्रम्हपुरी : 26 सप्टेंबर
तालुक्यातील देलनवाडी परिसरातील सहकार वसाहतीमध्ये राहणार्या ठाकरे कुटुंबातील पती, पत्नी व दोन मुले या चौघांनी आर्थिक विवंचनेतून किटकनाशक प्राशन करून सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना रविवार, 25 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. यात पत्नीचा मृत्यू झाला असून, पती व दोन मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांचावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रमांकात ठाकरे (55) हे सेवानिवृत्त असून पत्नी गिता (50) व मुले राहुल (28) व मनोज (26) यांच्यासह सहकार वसातहतीमध्ये किरायाच्या फ्लॅटमध्ये राहात होते. काही दिवसापासून हे कुटुंब आर्थिक विवंचनेत होते. राहूल व मनोज या दोघांचे शिक्षण पूर्ण होऊनही नोकरी न लागल्यामुळे कुटुंबात अशांती होती. त्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करीत असलेल्या या कुटुंबाने जिवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला व शुक्रवार, 23 सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास सर्वांनी किटकनाशक प्राशन केले. किटकनाशक प्राशन केल्यानंतर ते शनिवारी दिवसभर अत्यावस्थेत पडून होते. रविवारी रमाकांत ठाकरे हे काही प्रमाणात शुध्दीवर आले. तेव्हा त्यांनी दोन मुले जिवंत असल्याचे बघितले. मात्र, पत्नी निपचित पडून होती. पहाटे 5 वाजताच्या सुमारास रमाकांत यांनी तश्याच अवस्थेत सायकलने त्याच परिसरात राहणार्या आपल्या लहान भावाचे घर गाठून घटनेची माहिती दिली. रमाकांतच्या लहान भावाने लगेच आपल्या वाहनाने चौघांनाही ब्रम्हपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पत्नी गिता ठाकरे यांचा मृत्यू झाला. दोन्ही मुले राहुल व मनोज यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील मनोजची प्रकृती गंभीर आहे. तर, वडील रमाकांत यांना ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे समजते. घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहे.