भारत – कॅनडा तणावाला कॅनडाच जबाबदार
कॅनडा आणि भारताचे संबंध कमालीचे तणावग्रस्त बनले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी खलिस्तान फुटीरतावादी नेते हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारतीय गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचा आरोप करून भारताच्या एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. वास्तविक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा कोणताही हात नाही असे भारतीय परराष्ट्र खात्याने सांगूनही त्यांनी ही कारवाई केली. कॅनडाच्या या कारवाई नंतर भारतानेही कॅनडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली व कॅनडामध्ये जाणाऱ्या प्रवाशांचा व्हिसा तहकूब केला या घटनेनंतर दोन्ही देशातील तणाव कमालीचा वाढला आहे आणि याला सर्वस्वी कॅनडाच जबाबदार आहे.
खलिस्तान या फुटीरतावादी संघटनेवर भारताने बंदी घातली आहे मात्र कॅनडा या देशाने खलिस्तानला कायम समर्थन दिले आहे. याच संघटनेने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या घडवून आणली आहे. भारतापासून अलग होऊन स्वतंत्र खलिस्तान राष्ट्र निर्माण करणे हे या संघटनेचे ध्येय आहे. १९८० च्या दशकात ही संघटना खूप आक्रमक होती. ही संघटना भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहे म्हणून भारताने तिच्यावर बंदी घातली मात्र आजही या फुटीरतावादी संघटनेचे काम चालूच आहे. या संघटनेला परदेशातून विशेषतः कॅनडा या देशातून आर्थिक आणि सामरिक मदत मिळते. १९८० च्या दशकात जेंव्हा खलिस्तान चळवळ जोमात होती तेंव्हा पासूनच कॅनडामधून त्यांना आर्थिक रसद पुरवली जात होती. आज ४० वर्षानंतही परिस्थिती बदलली नाही. आजही कॅनडा सरकार खलिस्तानचे उघड समर्थन करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे खुलेआम खलिस्तानवादयांचे समर्थन करत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात खलिस्तान समर्थक मंत्र्यांचा समावेश आहे. अमृतपाल सिंग या खलिस्तानी अतिरेक्याला भारताने अटक केल्यावर विदेशातील खलिस्तान समर्थक कॅनडामध्ये एकवटले आहेत.
कॅनडा मध्ये भारतविरोधी कारवाया पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रुडो यांना भारतविरोधी खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली परंतु ट्रुडो यांनी पंतप्रधानांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. एव्हढेच नाही तर टोरोंटो आणि ओंटोरिया या शहरात खालसा स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे त्यांचे खलिस्तानचा ध्वज देऊन स्वागत करण्यात आले. ट्रुडो यांच्या या भूमिकेचा भारत सरकारने तीव्र शब्दात निषेध केला मात्र भारताच्या निषेधाकडे ट्रूडो यांनी दुर्लक्ष करत खलिस्तानला समर्थन देणे चालूच ठेवले. ट्रुडो यांची खलिस्तानवाद्यांना समर्थन देण्याची फुटीरतावादी भूमिका म्हणजे भारतविरोधी शत्रुत्वाची भावना आहे. वास्तविक भारताने कॅनडासोबत कायम मित्रत्वाचे संबंध ठेवले आहे. भारत कॅनडाला मित्रच मानतो मात्र कॅनडा फुटीरतावाद्यांना पाठबळ देत आहे त्यामुळे भारताने याची गंभीरपणे नोंद घेऊन कॅनडाला खडसावले. त्यामुळेच जस्टीन ट्रूडो यांनी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचे भांडवल करून भारताशी पंगा घेतला आहे. अर्थात कॅनडा हे एकट्याच्या जोरावर करत नाही हे उघड आहे कॅनडाला काही देशांचा छुपा पाठिंबा आहे.
भारत कॅनडात तणाव निर्माण झाल्यावर पाकिस्तानने कॅनडाची बाजू घेत भारतावर टीका केली. पाकिस्तान हे करणारच होता त्यात काही विशेष नाही मात्र भारताचा मित्र देश असलेल्या ऑस्ट्रेलियाने देखील यात कॅनडाची बाजू घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऑस्ट्रेलियन परराष्ट्र खात्याने भारताने या हत्येच्या तपासात कॅनडास सहकार्य करावे असे म्हंटले आहे वास्तविक या हत्येमागे भारताचा हात नाही असे भारताने स्पष्ट केले असतानाही या देशाने अशी भूमिका का घेतली हे एक कोडे आहे. वास्तविक खलिस्तान ही फुटीरतावादी संघटना आहे ती भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देते आहे.
भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे किंवा फुटीरतावाद्यांना पाठबळ देणारे आमचे मित्र होऊ शकत नाही असे भारताने कॅनडाला ठणकावून सांगायला हवे. जोवर कॅनडा फुटीरतावाद्याना समर्थन आणि पाठबळ देणे थांबवत नाही तोवर दोन्ही देशातील संबंध पूर्ववत होणार नाही अशी भारताने ठोस भूमिका भारताने घ्यायला हवी इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील हा मुद्दा उचलून धरायला हवा.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे