प्रगत मूत्राशयाच्या कर्करोगासाठी *प्रथमच ‘रेडिकल सिस्टो-प्रोस्टेक्टॉमी विथ इलियल कॉन्ड्युट’ शस्त्रक्रिया यशस्वी

8

प्रगत मूत्राशयाच्या कर्करोगासाठी *प्रथमच ‘रेडिकल सिस्टो-प्रोस्टेक्टॉमी विथ इलियल कॉन्ड्युट’ शस्त्रक्रिया यशस्वी

चंद्रपूरच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा

✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो:-7498051230

चंद्रपूर, 26 : चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक अभूतपूर्व यश मिळाले आहे. कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील शल्यचिकित्साशास्त्र विभागाने जिल्ह्यातील पहिलीच ‘रेडिकल सिस्टो-प्रोस्टेक्टॉमी विथ इलियल कॉन्ड्युट’ ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. ही शस्त्रक्रिया 72 वर्षीय शंकर अणकुलवार या रुग्णावर करण्यात आली. त्यांना प्रगत अवस्थेतील मूत्राशयाचा कर्करोग (Advanced Bladder Cancer) असल्याने ही शस्त्रक्रिया आवश्यक होती.

रेडिकल सिस्टेक्टॉमीमध्ये संपूर्ण मूत्राशयासह प्रोस्टेट व दोन्ही बाजूचे पेल्विक लिम्फ नोड्स काढले जातात आणि त्यानंतर रुग्णासाठी सुरक्षित लघवीसाठी इलियल कॉन्ड्युट (डायव्हर्जन युरोस्टॉमी) तयार केला जातो. ही शस्त्रक्रिया अतिशय अवघड मानली जाते. ज्यासाठी उच्च तांत्रिक कौशल्य, सुसंवादी टीमवर्क आणि विशेष शस्त्रक्रियेनंतरची काळजी आवश्यक असते.

या ऐतिहासिक शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरिता दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. अमित चिद्दरवार (युरोसर्जन) यांच्या नेतृत्वात बधिरीकरण विभागप्रमुख डॉ. राजेश नगमोथे व डॉ. तृप्ती बेलेकर, तसेच निवासी डॉक्टर डॉ. शंतनू कल्पल्लिवार, डॉ. कल्पक गरमाडे, डॉ. फुरकान अहमद, डॉ. अजित पावरा, डॉ. अजिंक्य गव्हाणे, डॉ. शोएब शेख आणि परिचारिका वर्ग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अणकुलवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून रुग्ण सध्या अतिदक्षता विभागात स्थिर आहे व त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना सांगितले की, हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आतापर्यंत अशा उच्च दर्जाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना नागपूर, हैदराबाद किंवा मुंबईसारख्या दूरवरच्या शहरांत जावे लागत होते. आता अशा सुविधा आपल्या जिल्ह्यातच उपलब्ध होत आहेत, ही मोठी क्रांती आहे. हे यश केवळ शस्त्रक्रिया कौशल्य दाखवते असे नाही, तर कर्मवीर मा.सां.कन्नमवार, शासकीय वैद्येकीय महाविद्यालय व रुग्णालय, हे प्रगत वैद्यकीय सेवांचे केंद्र म्हणून झपाट्याने पुढे जात असल्याचेही अधोरेखित करते. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे हजारो रुग्णांना स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाची उपचार सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.