तलासरीत ज्ञानमाता सदन संस्थेचे शताब्दी वर्ष उत्साहात
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
तलासरी :- तलासरी भागात शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा वैभवशाली वारसा जपणाऱ्या ज्ञानमाता सदन संस्थेने यावर्षी शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. २४ फेब्रुवारी १९२३ रोजी फ्रान्सिस्कन ब्रदरांच्या माध्यमातून संस्थेची पायाभरणी झाली. त्या काळात अंधश्रद्धा, कर्जबाजारीपणा आणि सावकारांच्या वेठबिगारीत खितपत पडलेल्या वारली समाजाला शिक्षणाचा प्रकाश देण्याचा ध्यास ब्रदरांनी घेतला. सुरुवातीला भीती, गैरसमज आणि अडचणींचा सामना करत त्यांनी आरोग्यसेवा व शिक्षणाचा प्रसार सुरू केला.
१९५० मध्ये कनोशियन सिस्टर्सनी दवाखाना सुरू केला आणि १९६५ मध्ये ‘ज्ञानमाता सदन शिक्षणसंस्था’ अधिकृतपणे स्थापन झाली. आज या संस्थेअंतर्गत तलासरी व डहाणू भागात ११ प्राथमिक, ४ माध्यमिक, २ ज्युनियर कॉलेजेस, वसतिगृहे व दवाखाने कार्यरत असून छोटं रोपटं वटवृक्षासारखं बहरलं आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खेळ, नृत्य, नाट्य, वारली पेंटिंग, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा नियमित घेतल्या जातात. झरी विद्यालयाने सलग SSC व HSC मध्ये शंभर टक्के निकालांची परंपरा राखली असून राज्यस्तरीय खेळाडू व कलावंत घडवले आहेत. यंदा तालुकास्तरीय कबड्डी, बुद्धिबळ, कॅरम, लोकनृत्य व भूमिका अभिनय स्पर्धांमध्ये झरी शाळेने चमकदार कामगिरी करत जिल्हा पातळीवर मजल मारली.
याशिवाय आरोग्य तपासणी, लसीकरण मोहिमा, आत्मसंरक्षणासाठी कराटे क्लासेस, निबंध व चित्रकला स्पर्धा अशा अनेक उपक्रमांद्वारे विद्यार्थी सक्षम होत आहेत. NMMS व भूगोल प्रज्ञाशोध परीक्षांसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
२६ सप्टेंबर रोजी झालेल्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत नगराध्यक्ष सुरेश भोये, सरपंच मीना ठाकरे, संस्थेचे संचालक फादर नीलम लोपीस, फादर सॅबी कोरिया, तसेच प्राचार्या सिस्टर बस्तियान फर्नांडिस यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मान्यवरांनी संस्थेच्या शताब्दी वर्षाचे अभिनंदन करून आगामी काळात येथील खेळाडूंनी आशियाई स्तरावरही यश मिळवावे, अशा शुभेच्छा दिल्या.
आज शंभर वर्षांनंतरही ज्ञानमाता सदन संस्था आपला प्रारंभीचा उद्देश विसरलेली नाही. शिक्षण, आरोग्य, सामाजिक जागृती आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व अंगांनी ती आदिवासी समाजासाठी झटत आहे आणि हाच तिच्या शताब्दी वर्षाचा खरा गौरव आहे.