क्रेडिट कार्डची माहिती घेऊन फसवणूक करणार्‍यांना दिल्लीतून अटक

49

क्रेडिट कार्डची माहिती घेऊन फसवणूक करणार्‍यांना दिल्लीतून अटक

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा २६/१०/२१
तुमचे क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. सुरू ठेवायचे असल्यास कार्ड नंबर व ओटीपी सांगा असे सांगून विश्‍वासात घेऊन त्यांच्या बँक खात्यातून 99 हजार 275 रुपयांची काढून आर्थिक फसवणूक केली. याबाबतची तक्रार फिर्यादीने दिल्यानंतर वर्धा सायबर सेलने तपासाची चक्रे फिरवून दिल्ली येथून आरोपींना अटक केली. विवेक प्रसाद शहा (21) रा. विकासनगर दिल्ली, आकाश गणेश मंडल (21) आणि रॉबिन श्याम करोटीया (21) रा. दिल्ली अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 3 मोबाईल, दोन डेबिट कार्ड, बँक पासबूक असा एकूण 9 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट येथील सुप्रिया झाडे यांना 6 सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने फोन करून बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे क्रेडिट कार्ड बंद होत आहे, सुरू ठेवायचे असल्यास कार्ड नंबर व ओटीपी सांगा, असे म्हणून फिर्यादीच्या बँक खात्यातून 99 हजार 275 रुपये लंपास केले. या प्रकरणाची तक्रार सुप्रिया झाडे यांनी हिंगणघाट पोलिस ठाण्यात नोंदविली होती. तक्रारीच्या आधारे सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल वर्धामार्फत करण्यात आला. तांत्रिक माहिती काढण्यात आली असता आरोपी दिल्ली येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सायबर सेलचे पथक दिल्ली येथे रवाना झाले होते. व तिन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संपत चव्हाण, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, सहाय्यक
पोलिस निरीक्षक महेंद्र इंगळे, सायबर सेलचे पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे, पोलिस अंमलदार निलेश कट्टोजवार, अनूप कावळे, स्मिता महाजन, निलेश तेलरांधे, आकाश कांबळे यांनी केली.