लहान मासे पकडल्यास थेट कारवाई

31

लहान मासे पकडल्यास थेट कारवाई

राज्य शासनाचा मच्छिमारांना इशारा; मत्स्यसाठ्याच्या संवर्धनासाठी निर्णय

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- बेसुमार मासेमारीमुळे माशांच्या विविध प्रजाती दुर्मिळ होत चालल्या असून, त्यामुळे लहान माशांना वाचवण्यासाठी शासनाने माशांचे आकार निश्चित केले आहेत. त्यामुळे आता मोठेच मासे विक्रीला असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे अधिक पैसेही मोजावे लागतील. लहान मासे पकडल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

अनेकदा मासे लहान असतानाच पकडले जातात. त्याचा परिणाम माशांच्या प्रजोत्पादनावर होतो. लहान मासे पकडल्यामुळे पुढील वर्षी माशांचे प्रमाण कमी होते. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण करणे, मत्स्यसाठ्याचे संवर्धन करणे अशा हेतूने लहान मासे पकडण्यावर शासनाने बंदी घातली आहे. त्यासाठी 54 प्रजातींच्या माशांचे आकारमान ठरविण्यात आले. माशांची पिल्ले पकडल्यास घाऊक विक्रेत्यांना 50 हजार ते 5 लाख, तर किरकोळ विक्रेत्यांना माशांच्या किमतीच्या पाच पट दंड भरावा लागणार आहे.

मत्स्यव्यवसाय विभागाकडून याबाबत जनजागृती करण्यात येत असली, तरीही मोठ्या प्रमाणात माशांची पिल्ले पकडली जातात. अनेकदा करदी, जवळा, मांदेली, कोळंबी, टेंडली या प्रजातीच्या लहान व प्रौढ माशांची मासेमारी करताना लहान जाळ्यांचा वापर केला जातो. माशांची लहान पिल्ले चुकून जाळ्यात सापडतात. मात्र, या नियमामुळे अकारण कारवाईची भीती मच्छिमारांमध्ये निर्माण झाली आहे. माशांच्या पिल्लांच्या अनियंत्रित मासेमारी थांबवण्यासाठी शासनाने काही कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईचा हेतू योग्य असला तरी सर्व मच्छिमारांना एकाच चौकटीत बसवून केलेली ही कृती अन्यायकारक ठरेल. माशांच्या पिल्लांच्या संरक्षणासाठी अवैध मासेमारी केंद्रांवर ठोस आणि कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असे मत कोळी बांधवांनी व्यक्त केले.

कोणता मासा किती आकाराचा?
ठिपकेदर कोळंबी (कापशी) 110 मिमी, ब्ल्यू क्रॅब (नील खेकडा) 90 मिमी, वाळूतील लॉबस्टर (फटफटी) 150 मिमी, ग्रे शार्पनोज शार्क (मुशी) 530 मिमी, काळा पापलेट (हलवा) 170 मिमी, स्पॉटेड सिर (सुरमई) 370 मिमी आदी विविध प्रजातींच्या माशांचे आकारमान निश्चित करण्यात आले.
मच्छिमार नाराज
मच्छिमारांवर एकतर्फी कारवाई करणे अन्यायकारक असल्याचे मत मच्छिमारांनी व्यक्त केले आहे. खोल समुद्रात मासेमारी करताना जाळ्यात चुकून काही वेळा माशांची पिल्ले अडकतात. त्यामुळे मासेमारीत 30 टक्क्यांपेक्षा जास्त पिल्ले सापडली, तरच संबंधितांवर कारवाई करावी. तसेच, पिल्लांची विक्री व खरेदी करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.
मासेमारीच्या दोन पद्धती
समुद्रात दोन प्रकारच्या मासेमारी पद्धती प्रचलित आहेत. तरती आणि बुडी तरती पद्धतीत जाळे समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगतात आणि त्यात माशांची पिल्ले मोठ्या प्रमाणात अडकतात. बुडी पद्धतीत जाळे खोल समुद्रात बुडवले जातात. त्यात मोठे मासे अधिक सापडतात. तरती मासेमारीमुळे सर्वाधिक प्रमाणात पिल्लांची हानी होते.
जागृतीचा अभाव
बेसुमार मासेमारी रोखण्यासाठी माशांच्या 54 प्रजातींचे आकारमान निश्चित करण्याबाबत नोव्हेंबर 2023 मध्ये मत्स्यव्यवसाय विभागाकडून आदेश काढण्यात आले. त्यात कारवाईबाबत कोणतेही स्पष्टीकरण नव्हते. मात्र, ऑक्टोबर 2025 मध्ये कारवाईबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेक मच्छिमारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, शासनातर्फे माशांचे आकारमान व कारवाईबाबत मासेमारांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्याअंतर्गत मच्छिमारांच्या कार्यशाळादेखील घेण्यात येत आहेत.