रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत पुढाऱ्यांच्या लेकीसुनांचा बोलबाला

68

रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत पुढाऱ्यांच्या लेकीसुनांचा बोलबाला

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- राजकारणात संधी मिळेल तिथं आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे. अगदी ग्रामपंचायत निवडणुकीपासून जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकीच्या निवडणुकीत प्रथम प्राधान्य पुढाऱ्यांच्या घरातील उमेदवाराला दिलं जातं. नगरपालिका निवडणूक देखील त्याला अपवाद नाही. रायगड जिल्ह्यातदेखील नगरपालिका निवडणुकीत लेकीसुनांचा बोलबाला पहायला मिळतो. यावेळी राजकीय कुटुंबातील चार लेकीसुना नगराध्यक्षपदासाठी आपले नशीब अजमावत आहेत.

रायगडचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिले असून सध्या येथे शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. पालकमंत्रीपदाच्या वादापासून सुरू झालेली चर्चा आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतरांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे रायगडातील घडामोडी राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहेत.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या वारसांना राजकीय पटलावर उतरवण्याची संधी साधली आहे. निवडणूक कुठलीही असो जर महिला आरक्षण असेल तर आपल्‍या बायकोला, बहिणीला किंवा कुटुंबातील महिलेला त्‍या ठिकाणी उभं करायचं असा प्रघातच पडून गेला आहे. परंतु अनेकदा महिला आपल्‍या कर्तृत्‍वावरदेखील पुढे आलेल्‍या पहायला मिळतात. यावेळी नगराध्‍यक्षपदाच्‍या निवडणूकीत विशेष म्हणजे दोन लेकी आणि दोन सुना अशा चार तरुणी सरळ राजकीय मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्या राजकीय वाटचालीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कुटुंबाकडून मिळालेला राजकीय वारसा त्‍यांच्‍यासाठी जमेची बाजू ठरणार असे चित्र आहे.

अलिबागमध्ये माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्‍या कन्या अक्षया नाईक यांना शेकापने नगराध्‍यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. तर मुरुडमध्ये माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांच्‍या कन्या आराधना नाईक राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. पेणमध्ये भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांच्या सुनबाई प्रीतम पाटील यांना नगराध्‍यक्ष पदासाठी पुन्‍हा संधी मिळाली आहे. त्‍यांनी सलग दोनवेळा नगराध्‍यक्षपद भूषवले आहे. तर कर्जत येथे माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई डॉ. स्वाती लाड यांना भाजपाने नगराध्‍यक्ष पदाच्‍या निवडणूक रिंगणात उतरवले आहे. यातील प्रीतम पाटील या अनुभवी असून त्‍यांनी यापूर्वी पेणचे नगराध्‍यक्षपद भूषवले आहे. मात्र उर्वरीत तिघीही राजकारणात नवख्‍या आहेत. त्‍यांच्‍या घरात त्‍यांनी राजकारण जवळून पाहिले असले तरी सक्रीय राजकारणात त्‍या पहिल्‍यांदाच उतरल्‍या असून थेट नगराध्‍यक्ष पदासाठी आपले नशिब अजमावत आहेत. यापैकी अलिबागच्‍या नगराध्‍यक्षपदाची निवडणूक लढवणारया अक्षया नाईक अवघ्‍या २२ वर्षांच्‍या असून त्‍या निवडून आल्‍यातर रायगड जिल्‍ह्यातील सर्वांत तरुण नगराध्‍यक्ष ठरणार आहेत.

या चारही उमेदवारांनी आपल्या आपल्या शहरांमध्ये जोरदार प्रचार सुरू केला आहे. राजकीय कुटुंबातील लेकीसुना निवडणूकीच्‍या रिंगणात उतरल्‍याने स्थानिक पातळीवर उत्सुकता वाढली आहे. परिवाराचा राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या या नव्या चेहऱ्यांपैकी कोण बाजी मारणार, कोण मतदारांना आकर्षित करणार आणि कोण पुढील स्थानिक नेतृत्व बनेल, याकडे आता रायगड जिल्‍ह्याचे लक्ष लागले आहे.