मार्गशीर्ष व्रतवैकल्याच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या

38

मार्गशीर्ष व्रतवैकल्याच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. त्यासाठी लागणारे पुजेचे साहित्य, देवीचे मुखवटे, चूनरी, लक्ष्मीव्रत वाचन पोथी आदी साहित्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. या वस्तु खरेदीसाठी महिलांची दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. महालक्ष्मी व्रताला गुरुवारी (दि.27) पासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी खरेदीची लगबग आदल्यादिवशी बुधवारी बाजारात दिसून आली.

हिंदू संस्कृतीमध्ये मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. धनसंपत्ती, सुख-समृद्धी नांदावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीची स्थापना करून महिलांकडून उपवास केला जातो. देवीच्या पूजनासाठी लागणारे साहित्य, सुबक, आकर्षक आणि विविध प्रकारच्या मुखवट्यांची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे अलिबाग,पोयनाड, रेवदंडा, आदी बाजारात यंदा फायबर आणि प्लास्टिकचे मुखवटे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या मुखवट्यांच्या किंमती 150 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहेत. यात वैष्णोदेवी, कोल्हापूरची अंबाबाई, मुंबादेवी आणि एकविरा देवीचे मुखवटे यांचा समावेश आहे. मुखवट्यांबरोबरच डोळे, नथ आणि कुंकू असलेले मुखवट्याचे स्टिकरही बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. महालक्ष्मीला सजवण्यासाठी यंदा खण, पैठणी, कोल्हापुरी, अशी विविध प्रकारची आकर्षक वस्त्रे, पोथी तसेच घडवणीचे आकर्षक दागिने उपलब्ध आहेत. आजपासून महालक्ष्मी व्रताला सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने पुजेच्या साहित्यांसह सजावटीच्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी महिलांची अलोट गर्दी बुधवारी बाजारात दिसून आली. एक वेगळा उत्साह या निमित्ताने
दिसून आला.

मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रत केले जाते. त्यानिमित्ताने लागणारे पुजेचे साहित्य, देवीचे मुखवटे आदी वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनी आदल्या दिवशी गर्दी केली. घडविण्याच्या दागिन्यांसह देवीच्या मुखवट्यांना प्रचंड मागणी आहे.

–दिनेश काराणी
दुकानदार
क्लासिक नॉव्हेल्टी,अलिबाग