वाहतूक कोंडी नियंत्रित करा..! शहरातील सर्वपक्ष एकवटले

57

वाहतूक कोंडी नियंत्रित करा..! शहरातील सर्वपक्ष एकवटले

वाहतूक कोंडी नियंत्रित करा..! शहरातील सर्वपक्ष एकवटले
वाहतूक कोंडी नियंत्रित करा..! शहरातील सर्वपक्ष एकवटले

✒क्रिष्णा वैद्य✒
चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी
9545462500

ब्रम्हपुरी : – मनुष्य जगण्यासाठी त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे जाळे जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्व कोणत्याही शहरातील वाहतूक मार्गाचे.मात्र या रचनेला खंत वाटावी असे रस्त्यावरील वाढणारे अपघात व त्यातील बळी पडणाऱ्यां संख्येवरून लक्षात येत आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवून शहर अपघातमुक्त करावे अशी मागणी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

शहरातील वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषद , वाहतूक पोलिस विभाग, नागरिक आणि वाहनचालक या सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.
शहरातील वाहतुकीचा वाढता गुंता कसा सोडवता येईल याबद्दल आता कृतीची वेळ आली आहे पण ही कृती औट घटकेची नसावी…!

वाहनांचे नियंत्रण आणि वाहन कायद्याची अंमलबजावणी हा पोलिसांच्या वाहतूक शाखेचा विषय असल्याने या यंत्रणेकडून नियोजन व्हायलाचं हवे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल केला की झाले आणि नियम मोडणाऱ्यांना कडक शिक्षा करणे, म्हणजे दंडाची रक्कम वाढवणे असा गोड गैरसमज वाहतूक पोलिसांचा झाला आहे. वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या नादात वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियंत्रण होताना दिसत नाहीत.नियम मोडणाऱ्यांना शिक्षा जरूर करायला हवी; पण त्याच वेळी गर्दीच्या वेळी चौकात थांबून पोलिसांनी वाहतुकीचे नियंत्रणही करायला हवे.

पालिकेकडून शहरात नवीन रस्ते, फुटपाथ,आदी बांधले जातांना पुढील वीस वर्षांतील वाढत्या वाहतुकीचा विचार होत नाही. केवळ वाहतुकीच्या कारणास्तव शहराचे नाव खराब होणे चांगले नाही. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, ती गतीमान कशी राहील यासाठी प्रयत्न करणे ही पालिका, वाहतूक पोलिस आणि सर्वच वाहनचालकांची, पादचाऱ्यांची जबाबदारी आहे.

प्रशासनास तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने तालुकाध्यक्ष श्री वासुदेव सोंदरकर, शहर भाजपा युवा मोर्चा च्या वतीने श्री प्रा सुयोग बाळबुधे यांनी निवेदनाद्वारे विनंती करीत,शहरात होतं असलेली “वाहतूक कोंडी’ सोडविण्यासाठी न्यायिक व कठोर निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात येऊन नागरिकांना दिलासा देण्यात यावा अन्यथा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शहर भाजपा कडून तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन दिले तर सदर निवेदन पालकमंत्री चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर,पोलीस अधीक्षक चंद्रपूर व नगरपरिषद मुख्याधिकारी ब्रम्हपुरी यांना सुद्धा पाठवण्यात येऊन शहर अपघातमुक्त करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया –
*शहरात होतं असलेली “वाहतूक कोंडी” सोडवण्यास प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष देऊन नागरिकांना होणारी असुविधा दूर करावी अन्यथा तालुका शिवसेना आक्रमक भूमिका घेणार-*
नरुभाऊ नरड
तालुकाध्यक्ष शिवसेना ब्रम्हपुरी

प्रतिक्रिया –
*दारुदुकान ला पार्किंग नियमावली नसणे, सत्ताधारी वर्गाकडून कायद्याला फाटा तर पालिका व पोलीस विभाग मिलिभगत करून वरिष्ठ राजकारण्यांच्या दबावात काम करीत असल्याने शहरात “वाहतूक कोंडी” होऊन नागरिकांना अमाप त्रास सहन करावे लागत आहे. प्रशासनाने यावर तोडगा काढावा*

डॉ. प्रेमलाल मेश्राम
जेष्ठ कार्यकर्ते
वंचित बहुजन आघाडी

प्रतिक्रिया –
*शाळा व महत्वाच्या ठिकाणा जवळील होतं असलेल्या ‘वाहतूक कोंडी’ बाबत प्रशासनाने कठोर निर्णय घ्यावे व गरजेच्या ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल ची व्यवस्था करावी अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यात येईल*

श्री विनोद झोडगे
कॉ.राज्य कॉन्सिल सदस्य तथा भाकप नेते