या तंत्रज्ञानाचा वापर करून झाले होते अभिनेत्री रश्मिका मंदानाचे खोटे विडिओ व्हायरल

सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. इंटरनेट आज जीवनावश्यक गरज बनली आहे. आजच्या या इंटरनेट युगात सोशल मीडिया हा परवलीचा शब्द बनला आहे. सोशल मीडियाचा वापर करत नाही असा व्यक्ती आज शोधूनही सापडणार नाही. लहानांपाूसून थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतापर्यंत, सर्वसामान्यांपासून सिलेब्रेटिंपर्यंत सर्वचजण सोशल मीडियाचा वापर करतात मात्र आज हाच सोशल मीडिया सीलेब्रेटिंसाठी साठी डोकेदुखी बनत आहे. सोशल मीडियाचा वापर करून विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात हे तर आपल्याला माहीतच आहे. कधी सिलेब्रेटिंच्या निधनाच्या अफवा पसरवल्या जातात तर कधी सिलेब्रेटिंचे फोटो मोर्फ करून त्यांची बदनामी केली जाते तर कधी विविध प्रकारचे मिम्स बनवून त्यांची टर उडवली जाते. आता तर एआयच्या मदतीने सिलेब्रेटिंचे थेट डीपफेक व्हिडिओ बनवून त्यांना बदनाम केले जात आहे. बॉलिवूडची नवोदित पण लोकप्रिय अभिनेत्री असलेली रश्मीका मंधना हीचा असाच एक डीपफेक व्हिडिओ प्रसार माध्यमात व्हायरल करण्यात आला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कला क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर स्वतः अभिनेत्री रश्मीका हिने हा व्हिडिओ तिचा नसल्याचे सांगून व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तिला मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनीही संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा एका दुसऱ्याच मुलीचा आहे. मात्र एडिटिंग करून त्या मुलीच्या चेहरा लपवून त्याजागी रश्मीकाचा चेहरा लावण्यात आला. हा व्हिडिओ एडिटिंग करताना एआय या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. डीपफेक हा शब्द डीप लर्निगमधून घेण्यात आला असून तो एक शिकण्याच्याच प्रकार आहे. या शब्दात डीप हा शब्द असल्याने या शब्दाला अनेक पदर आहेत. डीप लर्निंग हे कृत्रिम न्युरल नेटवर्कवर आधारित आहे. या अल्गोरिदममध्ये बनावट साहित्य आणि भरपूर डेटा प्रविष्ट करून त्याचे एका विशिष्ट सामुग्रिमध्ये रुपांतरीत केली जाते. जी माणसे तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करतात अशी माणसं बदला घेण्यासाठी डीप फेकचा वापर करतात. एआयच्या मदतीने व्हिडिओ आणि फोटो एडिट करून लोकांना त्रास दिला जातो इथे मात्र बदला घेण्यासाठी नाही तर बदनामी करण्यासाठी याचा वापर केला गेला. तंत्रज्ञानाने मानवी जीवनात क्रांती केली आहे. विज्ञानाच्या मदतीने दररोज नवे तंत्रज्ञान उदयास येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञानाचा हेतू मानवी कल्याण हेच आहे मात्र काही नतद्रष्ट लोक या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी नाही तर समाज विघातक कार्यासाठी करतात हा प्रकार त्यातलाच आहे. वास्तविक कोणाचाही असा फेक व्हिडिओ बनवून बदनामी करणे हा गुन्हा आहे. अशा समाज विघातक लोकांना कायद्याने कडक शिक्षा व्हायलाच हवी. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग ही नवीच समस्या आता निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानाचा असा दुरुपयोग करून कोणाचीही सहज बदनामी करता येत असल्यानेच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडिया वापरावा की नाही असा प्रश्न विचारला आहे. केवळ सिलेब्रेटिंच्या जीवनातच नव्हे सर्वसामान्यांच्या जीवनातही अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर कोणी केला तर त्यांचे आयुष्यच उध्वस्त होते म्हणूनच अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करणाऱ्या नतद्रष्टांना शिक्षा झालीच पाहिजे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here